महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच कायम; काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यात

8445

सोमवारी दिवसभरात मुंबईत प्रचंड राजकीय घडामोडी घडल्या. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मुदत दिली होती. त्याप्रमाणे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सायंकाळी 7 वाजता राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेची इच्छा व्यक्त केली आणि संख्याबळ दाखवण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी विनंती केली, मात्र राज्यपालांनी मुदतवाढ देण्यास नकार दिला. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला राजभवनावर बोलावून सत्तास्थापनेचा दावा करण्याचे निमंत्रण दिले असून त्यासाठी 24 तासांची मुदत दिली आहे. या घडामोडींमुळे राज्यातील सत्ता पेच मात्र कायम आहे.

विधानसभा निवडणूक निकालानंतर 18 दिवस झाले तरी राज्यातील सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला राज्यपालांनी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी निमंत्रण दिले होते. त्यासाठी भाजपला तीन दिवसांची मुदतही दिली होती, मात्र पुरेसे संख्याबळ नसल्याची स्पष्ट कबुली देत भाजपने सत्तास्थापनेचा दावा करण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून राज्यपालांनी शिवसेनेला निमंत्रण दिले, मात्र मुदत फक्त 24 तासांची दिली. या 24 तासांत मुंबई-दिल्लीत अनेक घडामोडी घडल्या, बैठका-खलबते झाली. शिवसेनेला आज संध्याकाळी साडेसातपर्यंतची मुदत होती. त्याप्रमाणे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेटही घेतली. आमची सत्तास्थापनेची इच्छा आहे, पण संख्याबळ दाखवण्यासाठी दोन दिवसांची मुदतवाढ द्यावी अशी मागणी त्यांनी केली. राज्यपालांनी मात्र ही मागणी फेटाळली आणि तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी-काँग्रेसला निमंत्रण दिले. राष्ट्रवादीला उद्या रात्री 8.30 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नाही हेच खरे!

भाजपचे वेट ऍण्ड वॉच

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी आज दुपारपासून भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरू होती. दिवसभरातील राजकीय घडामोडींची अखेर राज्यपालांनी राष्ट्रवादी निमंत्रण दिल्यानंतर झाली आणि मग भाजपनेही आपली बैठक संपवली. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि सध्या वेट ऍण्ड वॉचच्या भूमिकेत आहोत असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. पुढील निर्णय योग्यवेळी घेऊ असेही ते म्हणाले.

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आज बैठका

राज्यपालांच्या निमंत्रणानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. निमंत्रण स्वीकारायचे की नाही यावर मंगळवारी खलबते होणार असून मंगळवारी दुपारी 1 वाजता राष्ट्रवादीची मुंबईत तर सकाळी 10 वाजता काँग्रेसची दिल्लीत बैठक होणार आहे. सकाळची बैठक आटोपल्यानंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल आणि वेणुगोपाल हे तिघेजण दुपारी मुंबईत येतील आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करतील. त्याशिवाय शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही उद्या चर्चा होईल असे समजते.

दिवसभरात काय घडले

  • शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपापल्या आमदारांची बैठक घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. मात्र काँग्रेसचा जो काही निर्णय होईल त्या आधारावरच  आम्ही पुढे जाऊ असे सागितले.
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची वांद्रे येथील ताज लॅण्डस् एण्ड या हॉटेलमध्ये बैठक झाली आणि शिवसेनेने राष्ट्रवादीला अधिकृत प्रस्ताव दिला. या बैठकीला शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे हेसुद्धा उपस्थित होते.
  • महाराष्ट्रातील सत्ताकरणात काँग्रेसची भूमिका काय असावी यासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी कार्यकारी समितीची दोनदा बैठक घेतली. त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या आमदारांशीही चर्चा केली आणि त्यांचे मत जाणून घेतले.

उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्याशी फोनवर चर्चा केली.

  • दिल्लीहून काँग्रेसचे पत्रक जारी झाले. महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून पुढील भूमिका ठरवू असे या पत्रकात म्हटले आहे.
  • शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन मुदतवाढीची मागणी केली, पण राज्यपालांनी त्यास नकार दिला.
  • राज्यपालांनी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळास पाचारण केले. अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे राजभवनवर गेले. राज्यपालांनी त्यांना सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी निमंत्रण दिले असून उद्या मंगळवारी रात्री साडेआठपर्यंतची मुदत दिली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या