शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 10 हजार! उद्धव ठाकरे यांची घोषणा

561

महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा सात-बारा कोरा करून शेतकरी कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करणारच असे ठामपणे सांगतानाच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला किमान दहा हजार रुपये जमा करून ठेवण्याची योजना आणणार असल्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नगरमध्ये दिली. ‘तुम्हाला साठ वर्षे दिल्यानंतरही कामे करता आली नाहीत. बेरोजगारांचे तांडे फिरत आहेत. आघाडीवाले शरद पवारांसह सगळेच स्वतः बेकार झालेत म्हणून तुम्हाला भूमिपुत्र आठवला आहे काय? आता तुम्ही तुमच्या केलेल्या कर्माची फळे भोगा’ अशा शब्दांत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा समाचारही उद्धव ठाकरे यांनी घेतला.

उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराचा झंझावात नगर जिह्यातून आज सुरू झाला. संगमनेरमधील जाणता राजा मैदानावर शिवसेना महायुतीचे उमेदवार साहेबराव नवले, श्रीरामपुरात भाऊसाहेब कांबळे, पारनेरमध्ये विजय औटी, तर नगर शहरामध्ये नंदनवन लॉन्स येथे शिवसेना उपनेते, उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा झाल्या. या सभांना तेजस ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती.

सर्वांनाच दुरुस्त करायचे आहे
राजकारणात मेंदू लागत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच एकच हशा पिकला. त्याचे स्पष्टीकरण देताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी गाडीतून डॉ. सुजय विखे यांच्याबरोबर येत असताना बोलत होतो. ते न्यूरो सर्जन आहेत. राजकारणामध्ये मेंदू लागत नाही; पण आपल्याला आता राजकारणामध्ये सर्वांना दुरूस्त करायचे आहे. त्यामुळे खासदार असलास तरी ‘तू प्रॅक्टिस सोडू नको, तू प्रॅक्टिस करत राहा’, असे मी त्याला सांगितले, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच हास्यकल्लोळ झाला.
महाराष्ट्रातील पहिली सभा संगमनेरमध्ये असल्याने आमचा उमेदवार नक्कीच विजयी होईल असा विश्वास याप्रसंगी गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केला. तर शिवसेनेने विखे कुटूंबावर खूप प्रेम केले असून त्यांचे उपकार आम्ही विसणार नाही, असे खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले. याप्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार वैभव पिचड, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे आणि पदाधिकारी उपस्थित होते.

निळवंडेच्या पाण्यात विकासाचे प्रतिबिंब दाखवा
संगमनेरच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील या दोघांच्या आठवणींना उजाळा दिला. निळवंडे धरणासाठी शिवसेनेमुळे 2232 कोटी रुपयांचा निधी मिळाला. या कामातून संगमनेरमध्ये आपल्या सरकारचं प्रतिबिंब दिसायला पाहिजे. पण त्यासाठी आधी इथे पाणी आणू. त्यात फक्त सरकारचं नाही तर विकासाचं प्रतिबिंब दाखवायचे आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. नगर मतदारसंघात परिवर्तन पाहिजे आहे. तसेच संगमनेरमध्येसुद्धा परिवर्तन पाहिजे आहे. ते तुम्ही निश्चितपणे करणार, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच उपस्थितांनी जल्लोष केला.

तुमचे पाच–दहा निवडून येतील. उद्या आमचे सरकार आल्यावर ते तरी तुमच्यासोबत राहतील का?
आमच्याकडे आता सगळं हाऊसफुल्ल झालंय, सर्क चांगले लोक आमच्याकडे आले आहेत. धगधगते निखारे आज आमच्यासोबत आले आहेत. त्यामुळे तुमचा किस्तव पेटतोय का ते बघा. जे काही तुमचे पाच-दहा निकडून येतील ते तरी आमचे सरकार आल्यानंतर तुमच्यात राहतील का याचा किचार करा. असे होणार असेल तर मग कशाला त्यांना मतं द्यायची? ही तुमच्या भविष्याची निकडणूक आहे. त्यामुळे किचारपूर्वक मतदान करा.

तेजस ठाकरे यांची या सभांना विशेष उपस्थिती होती. व्यासपीठासमोर बसलेल्या तेजस ठाकरे यांना आयोजकांनी व्यासपीठावर बोलावून त्यांचा सत्कार केला. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘तेजस फक्त सभा पाहण्यासाठी आला आहे. तो जंगल आणि प्राण्यांमध्ये रमणारा आहे.’

ते ‘थोरात’ तर आम्ही ‘जोरात’
स्वतःला वीर बाजीप्रभूंची उपमा देणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा उद्धव ठाकरे यांनी यावेळी चांगलाच समाचार घेतला. ‘कुणाला कोणती उपमा द्यायची त्यासाठी आपण तितके समर्थ असायला पाहिजे’, असे फटकावताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवरायांसाठी प्राणांची बाजी लावली होती. राजे गडावर पोहचल्यावर त्यांनी आपले प्राण सोडले. त्यांच्याशी तुम्ही स्वतःची तुलना कशी करता? निवडणुकीच्या तोंडावर यांना वीर बाजीप्रभू आठवले.’ संगमनेरमधील थोरातांच्या करामती साऱ्यांनाच माहीत आहेत. त्यांना नाही अब्रू तर मी बोलायला कशाला घाबरू’, असे उद्धव ठाकरे म्हणताच एकच हशा पिकला. ‘तुमचा नेता (राहुल गांधी) बँकॉकला पोहोचला आहे, तेव्हा तुम्ही आता निर्धास्त घरी जा’, अशा शब्दांत थोरातांना फटकारले. संगमनेरमध्ये ते ‘थोरात’ तर आम्ही ‘जोरात’ आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या