भाजपच्या जोरबैठका सुरूच, पण हाती काय लागणार?

1225

राज्यात शिवसेना-भाजप महायुतीचेच सरकार येईल. आमच्या मनात दुसरे काही नाही, अशी भूमिका घेत भाजपने सत्तास्थापनेसाठी जोरबैठका सुरू केल्या असून भाजपच्या हाती काय लागणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. त्याच वेळी शिवसेना मात्र आपल्या भूमिकेवर अढळ राहिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना-भाजपचे जे सूत्र ठरलेय त्यानुसार शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद द्यावे या मागणीवर शिवसेना ठाम आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे.

विधानसभेचा कार्यकाळ संपण्यास दोनच दिवस शिल्लक राहिल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप शिष्टमंडळ उद्या राज्यपालांची भेट घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार आहेत. राज्यातील जनतेने शिवसेना-भाजप महायुतीला कौल दिला असून त्यांनी सरकार स्थापन करावा, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसने वेट अँड वॉचची भूमिका घेतली असून काँग्रेस आमदारांकडून मात्र भाजप विरहीत सरकारसाठी दबाव वाढताना दिसत आहे.

निवडणुका होऊन 14 दिकस उलटल्यानंतर गुरुवारी पहिल्यांदाच भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार आहेत. महायुतीच सरकार राज्यात येणार, लवकरच गोड बातमी मिळेल, असे भाजपकडून वारंवार सांगितले जात आहे. या भेटीत सत्तेचा दावा करण्यात येणार नसल्याचे संकेत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. पण राजकीय परिस्थितीकर ‘अवगत’ करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रत्येक पाऊल महायुतीच्या दिशेने – मुनगंटीवार

आमच्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. जनादेश हा महायुतीच्या सोबत आहे. महायुतीचे सरकार आणण्यासाठीच आमचे प्रत्येक पाऊल पुढे पडेल. याशिवाय आमच्या मनात दुसरा विचार नाही असे मुनगंटीवार म्हणाले. राज्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्वभूमीवर वर्षा बंगल्यावर आज सलग दुसऱ्या दिवशी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

चुकीचे पाऊल टाकणार नाही- मुनगंटीवार

आमचे चुकीचे पाऊल टाकण्याचा विचार केलेले नाही. सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही जाणार आहोत. काही गोष्टींची गोडी कायम राखायची असेल तर जेव्हा सरकार स्थापन होईल त्या दिवशी सरकार स्थापनेचे पूर्ण विश्लेषण मिळेल. संयम ठेवा, तुम्हाला फॉर्म्युलाही मिळेल. तो सांगितला जाईल. आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीबाबत आम्ही राज्यपालांना सांगण्यासाठी वेळ मागत आहोत. या संदर्भातील माहिती देण्यासाठी आम्ही राज्यपालांना भेटणार आहोत.

विधिमंडळ सचिवपदी राजेंद्र भागवत यांची नियुक्ती

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधिमंडळ सचिवालयाच्या सचिव पदावर राजेंद्र भागवत यांची नियुक्ती करण्यात आली. सचिव पदावर नियमित स्वरूपाची नियुक्ती होईपर्यंत भागवत यांच्याकडे विधिमंडळ सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

हवामानाचा अंदाज

  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पुणे, सातारा व कराडच्या दौऱ्यावर रवाना होणार
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार यांच्यावर आवश्यक निर्णय घेण्याची जबाबदारा
  • भाजपचे शिष्टमंडळ राज्यपाल
  • भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार
  • वर्षा बंगल्यावर भाजपच्या नेत्यांची सलग तिसऱ्या दिवशी बैठक
  • काँग्रेसच्या नेत्यांची मुंबईत बैठक, राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यास बाहेरून पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचा एक गट पक्षावर दबाव टाकण्याची शक्यता

भाजपचे राजभवन पर्यटन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिल्लीवारीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मंगळवारी झालेल्या भाजप कोअर कमिटी बैठकीनंतर भाजप नेते विनोद तावडे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. मात्र या भेटीत नेमके काय झाले हे अद्यापही कळू शकले नाही. उद्या गुरुवारी भाजप प्रदेश अध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्यपालांची भेट घेणार आहेत. या भेटीत सत्तेचा दावा केला जाणार की भाजप नेत्यांचे नुसते राजभवन पर्यटन याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या