दादागिरी कराल तर तोडून-मोडून टाकू! उद्धव ठाकरे यांचा घणाघात; कोकणात वादळ

3146

ही लढाई शिवसेना-भाजप किंवा कुणा व्यक्तीच्या विरोधात नाही, तर हा लढा खुनशी प्रवृत्तीविरुद्ध आहे. राणे ज्या पक्षात गेले त्या पक्षाची वाट लागली, पाठीत वार करणारी औलाद सोबत नको, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांचा चांगलाच समाचार बुधवारी घेतला. मी मैत्री आणि दोस्तीला जागणारा माणूस आहे. मित्राच्या घरात चोर, दरोडेखोर घुसताना शांत कसा बसू? आता जर दादागिरी कराल तर तोडून-मोडून टाकू असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरे यांनी कणकवली येथील प्रचारसभेत बोलताना दिला.

uddhav-thackeray-kankavli-rशिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ कणकवली येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. यावेळी बोलताना निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या आश्रयाला गेलेल्या नारायण राणे पितापुत्रांवर तोफ डागली. माझा कुठल्या व्यक्तीविरुद्ध लढा नाही. कोकण विरुद्ध खुनशी वृत्ती असा हा लढा आहे. इथे कुणी दादागिरीच्या फंदात पडू नये. कोकणी जनता भोळीभाबडी आहे, परंतु अद्यापपर्यंत मर्दुमकी शिल्लक आहे हे कोणी विसरू नये. येणाऱ्या काळात संपूर्ण कोकण किनारपट्टीकर भगवा फडकवू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मातोश्रीच्या मिठाला जागला नाही तो मिठाचा खडा आम्ही आमच्या मित्रपक्षातही ठेवू देणार नाही.  ज्याने शिवसेना सोडली, आम्हाला शिव्या घातल्या… ज्याने काँग्रेस सोडली, काँग्रेस नेत्यांना शिव्या घातल्या… आता यांची वागणूक पाहता स्वाभिमान भाजपात विलीन केल्यावर एकमेकांना शिव्या घालत बसले असतील. गेल्या काही वर्षांतील वागणूक पाहता कोकणच्या साध्याभोळ्या जनतेला हा राक्षस, बनून त्रास देणार होता. विनायक राऊत यांनी कोकणात ठाण मांडले. वैभव नाईक खंबीर उभा राहिला आणि पुन्हा एकदा सिंधुदुर्गात भगवे वादळ निर्माण झाले. कणकवलीतील सत्यविजय भिसे, श्रीधर नाईक, रमेश गोवेकर यांचे काय झाले? असल्या खुनशी वृत्ती आमच्याकडे नकोच; पण मित्राकडेही नको म्हणून मी कणकवलीत आलोय, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

जर uddhav-thackeray-vianayak-rभाजपाने एखादा कट्टर आणि चांगला कार्यकर्ता  उमेदवार म्हणून दिला असता तर आमची काही हरकत नसती. इतकेच काय, संदेश पारकर यांना उमेदवारी दिली असती तरीदेखील त्याच्या प्रचारसाठी मी आलो असतो. मुख्यमंत्रीसाहेब आपलं-माझं काही भांडण नाही, लढाई नाही. पण अनुभवातून मी माझ्या ज्या काही आठवणी आणि बोल आहेत त्या सर्वांच्या साक्षीने सांगतो, इतिहासातील चुका उगळत बसायच्या नसतात; पण त्यातून काहीतरी शिकून सावध व्हायचं असतं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

kankavli-uddhav-thackeray-rराणेंची वृत्ती एखाद्या मायावी राक्षसासारखी आहे. हा राक्षस आमच्या समोर काँग्रेसचे रूप घेऊन आला तेव्हा आम्ही त्याला गाडले. आता हा राक्षस भाजपचे रूप घेऊन शेवटची धडपड करत आहे. त्यालाही आम्ही निश्चितपणे गाडू, असा टोला त्यांनी लगावला. मी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार म्हटल्याकर, याला सातबारा कळतो का, असे कोणीतरी म्हणाले. मी कोणाच्या जमिनी बळकाकल्या नाहीत. जमिनी हडप केल्या नाहीत. त्यामुळे मला सातबारा कळत नाही. पण सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा नक्कीच कोरा करणार, असे त्यांनी सांगितले.

आज स्वाभिमान हा शब्द खूप आनंदित झाला असेल. कारण त्या शब्दालाही वाटलं असेल की ‘यांच्यामुळे’ मला इतके दिवस काळिमा लागला होता. काय तर म्हणे स्वाभिमान. यांना कसला आलाय स्वाभिमान. इकडे वाकवा मान, तिकडे वाकवा मान आणि म्हणे स्वाभिमान…

भाजपला जोरदार धक्का

sandesh-parkar-in-shivsenaभाजपचे बंडखोर नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, संदेश पटेल, माजी जि.प. अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, बँक संचालक दिगंबर पाटील, रंजन चिके, नामदेव मराठे यांच्यासह शेकडो प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी काही तासांपूर्वी पारकर, रावराणे, पटेल, लक्ष्मण रावराणे यांची पक्षातून हकालपट्टी केली होती आणि काही वेळातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सर्वांना शिवबंधन बांधत भाजपला जोरदार धक्का दिला.

कोकण भगवे करणारच!

कोकण भगवा करणार म्हणजे करणारच. सतीश सावंत यांना 24 मिनिटांत शिवसेनेचा एबी फॉर्म देण्यात आला. वास्तविक सतीश सावंत यांनी 14 वर्षांपूर्वी जी चूक करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता ती चूक त्या वेळी केली नसती तर आज ते आमदार असते. शिवसेनेचा तो ऐतिहासिक क्षण आता आला आहे, असे सांगत येत्या 24 ऑक्टोबरला सतीश सावंत विजयी होणारच, असा आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. आम्हाला कोकणात विनाशाचा विकास नको. छान हिरवेगार कोकणचे वैभव टिकवायचे आहे.  सिमेंटची जंगले उभारायची नाहीत. मुंबईत जी शिवसेना आहे ती फक्त कोकणी माणसामुळेच. कोकणात येताना मोठी ओढ आणि माया वेगळीच असते. सिंधुदुर्ग हा छत्रपतींचा सिंधुदुर्ग किल्ला असलेली भूमी आहे. या ठिकाणी शिवरायांचा भगवा फडकवण्याची श्रींची इच्छा आहे.  सावंतवाडी, कुडाळनंतर आता कणकवलीतही सतीश सावंत यांच्या रूपाने शिवसेनेचा भगवा फडकेल. तुमचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी मी कणकवलीत येणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

सतीश सावंत झाले नतमस्तक

satish-sawant-kankavli-rallशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कणकवली येथे जाहीर प्रचारसभा घेत सतीश सावंत यांना विजयी करण्याचे आवाहन केले. या वेळी गडनदी पुलानजीक जमलेल्या विराट जनसमुदायासमोर नतमस्तक होत सतीश सावंत यांनी शिवसेनेबाबत ऋण व्यक्त केले. शिवसेनेने दिलेल्या संधीचे सोने करत जनतेच्या आशीर्वादावर आमदार होणारच, असा शब्द या वेळी शिवसेना पक्षप्रमुखांना दिला.

सभेला तुफान गर्दी

huge-crowd-uddhav-thackerayकणकवलीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा सतीश सावंत यांच्या प्रचारार्थ गडनदीशेजारील मातीच्या भरावावर आयोजित करण्यात आली होती. या सभेला लाभलेली उपस्थिती पाहता विराट सभा झाली. मोठय़ा संख्येने आलेला शिवसैनिक आवेशपूर्ण घोषणा देताना दिसत होता. सभेच्या सुरक्षिततेसाठी चारही बाजूने भगवा पडदा बांधून सभास्थळ बंदिस्त करण्यात आले होते. मात्र गर्दी वाढल्याने खासदार विनायक राऊत यांनी सूचना करत महामार्गाच्या दिशेने असलेला भगवा पडदा हटवत मैदान मोकळे केले. तसेच अनेक शिवसैनिकांनी समोरच्या डोंगरावर जात जोरदार घोषणाबाजी करत आपला उत्साह दाखवला.

कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार सतीश सावंत, कुडाळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ गडनदी पुलानजीक भव्य प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवसेना नेते, उद्योग मंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार उदय सामंत, सिंधुदुर्ग-कोल्हापूर संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, भाई गोवेकर, संजय पडते उपस्थित होते.

फटकारे

 • जे समोर उभे आहेत त्यांना शिवसेनाप्रमुखांनी लाथ मारून हाकलून लावलं होतं.
 • करून करून भागले आणि देवपूजेला लागले. देवपूजा करताना ज्यांनी चपला काढल्या नाहीत असे लोक देवपूजेला लागले कसे?
 • ही पाठीमागे वार करणारी अवलाद आहे. हे माझ्याकडे तर नको, पण माझ्या मित्राकडेसुद्धा नको हे सांगण्याचे काम मी करत आहे.
 • त्यांच्यात काही दम नाही. त्यांच्या अरेला कारे केलं तर पुन्हा हे उभे राहणार नाहीत.
 • कोकणात जादू आहे, एक माया आहे. मायेचा ओलावा आहे.
 • संपूर्ण कोकण किनारा हा मला भगवा करून पाहिजे. सिंधुदुर्ग  किल्ल्याचे नाव या जिह्याला दिले आहे. येथे दुसरा कोणताही झेंडा फडकता कामा नये.
 • हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. हे करण्यासाठी इथले मावळे तयार आहेत.
 • विजय झाल्यानंतर इथे मी पुन्हा येणार आहे.
 • विकास म्हणजे समृद्धी पाहिजे,  विनाश करणारा विकास नको.
 • माझा छान हिरवागार कोकण राख करून नाणार उभा करणार असाल तर मला असा विकास नको.
 • जे आहे ते टिकवायचे आणि दुसरे वाढवायचे याला म्हणतात विकास, जे आहे त्याला भुईसपाट करणे म्हणजे विकास नाही.

कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार सतीश सावंत, कुडाळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ गडनदी पुलानजीक दणदणीत, प्रचंड गर्दीची सभा झाली.

आपली प्रतिक्रिया द्या