
राज्यासमोर अडचणी आहेत. पुढेदेखील येणार आहेत. मी असे म्हणत नाही की, राज्य खूप श्रीमंत आहे. कर्ज वाढले असेल तरी राज्याची आर्थिक परिस्थिती मजबूत असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला.
विधानसभेतील अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. राज्यासमोर अडचणी आहेत. पुढेदेखील येणार आहेत. पण तरीदेखील मी सांगतो, या अडचणीत मी असे म्हणत नाही की, राज्य खूप श्रीमंत आहे. राज्याची परिस्थिती खूप चांगली आहे, पण अडचणीच्या स्थितीत मार्ग काढण्याची क्षमता या महाराष्ट्राकडे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील पात्र शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफीचे निकष लवकरच जाहीर केले जातील, असेही फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईचा पाणी प्रश्न सोडवणार
मुंबई महानगर क्षेत्रात पिण्याच्या आणि उद्योगाच्या पाण्याची मोठी कमतरता होईल हे लक्षात घेऊन 2025 साली पोशीर आणि शिलार या धरणांच्या कामांना मान्यता दिली. याशिवाय गारगाई प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. यातून मुंबईला पाणीपुरवठा होईल. दमणगंगा पिंजाळच्या माध्यमातून 13 टीएमसी पाणी मिळत आहे. हे प्रकल्प पूर्ण झाले तर पुढील 30 वर्षे पाण्याची कमतरता भासणार नाही. काळू धरणाचा प्रश्नही पुनर्वसन मार्गी लागल्यावर सुटेल, असेही फडणवीस म्हणाले.
राज्यातील वीज दर कमीच होणार
विजेच्या दरांबद्दल बोलताना ते म्हणाले की, 0 ते 100 युनिटमध्ये वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांचे पुढील पाच वर्षांत विजेचे दर 26 टक्क्यांनी कमी होणार आहेत. 100 ते 300 युनिट वीज वापरणाऱ्यांचे दर 5 टक्क्यांनी कमी होणार आहेत. पूर्वी दरवर्षी आपले वीज बिल सरासरी 9 टक्क्यांनी वाढायचे. आता 2025 ते 2030 पर्यंत पुढील पाच वर्षांचा वीज दर निश्चित झालेला आहे. त्यामुळे आता विजेचा दर दरवर्षी 1.2 टक्क्यांनी कमी होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.




























































