Maharashtra Budget 2026 – चंद्रपूरमध्ये लोहार डोंगरी येथे व्याघ्र प्रकल्पाला प्राधान्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिह्यातील ब्रह्मपुरी अभयारण्यातील लोहार डोंगरी भागात जंगल आणि व्याघ्र प्रकल्पालाच सरकारचे प्राधान्य असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने लोहार डोंगरी येथे लोहखनिज खाण प्रकल्पांबाबतचा प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे पाठवला असून यासाठी सनफ्लॅग आयर्न अ‍ॅण्ड स्टील कोअर लिमिटेडने स्वारस्य दाखवले आहे. व्याघ्र प्रकल्पासाठी राखीव असलेल्या ब्रह्मपुरी वनक्षेत्रात हा प्रकल्प होणार असल्याचे मिलिंद नार्वेकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे निदर्शनास आणत या प्रकल्पाला स्थगिती देण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीत या खाण प्रकल्पाला मान्यता देणार नाही असे स्पष्ट केले.

ब्रह्मपुरीत 66 वाघ

ब्रह्मपुरीत 2024च्या सर्वेक्षणानुसार 66 वाघ होते आणि लोहार डोंगरी परिसरात 5 ते 8 वाघांची नोंद झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी जंगल, झाडे आणि व्याघ्र मार्गाचे संवर्धन करण्याला सरकारचे प्राधान्य असल्याचे गणेश नाईक म्हणाले.