Maharashtra Budget 2026 – महापालिका शाळांमधील चॉकलेटमध्ये काचा, प्लॅस्टिक आणि दगड आढळले; सुनील प्रभू यांनी वेधले लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्ये काचा, प्लॅस्टिक व दगड आढळून आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभेत केली.

अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना सुनील प्रभू यांनी महापालिकेच्या शाळेत वितरित केल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या चॉकलेटकडे सभागृहाचे लक्ष वेधले. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत न्युट्रिला चॉकलेट दिले जाते. त्याला ‘मिलेट न्युट्रिअल बार’ असे गोंडस नाव दिले आहे. या चॉकलेटमध्ये काच दगड, प्लॅस्टिक आढळले. ही परिस्थिती अतिशय वाईट आहे. सातत्याने तक्रारी येऊनही कार्यवाही होत नाही. युनानी नावाच्या कंपनीला वाटपाचे काम दिले आहे. सेंट्रल पर्चेस डिपार्टमेंटने याची चौकशी करावी. निकृष्ट चॉकलेटमुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. मुलांच्या पोटात प्लॉस्टिक आणि काचा गेल्या तर मृत्युमुखी पडण्याची भीती आहे. याला जबाबदार कोण? यावर कारवाई करा असे सांगत त्यांनी चॉकलेटचे शिक्षणमंत्र्यांकडे फोटो दिले.

शिक्षकांची कमतरता

मराठी माध्यमांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली तर शिक्षक काढून घेतले जातात; पण ज्या शाळांमध्ये विद्यार्थी वाढतात त्या शाळांमध्ये शिक्षक मंजूर करण्यासाठी विलंब होतो. शाळांमधील इंग्रजी, गणित या विषयांचे शिक्षक निवृत्त झाल्यावर त्या जागेवर अतिरिक्त उपलब्ध शिक्षकांमधून आवश्यक शिक्षक मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते याकडे त्यांनी लक्ष वेधले.

नॅशनल पार्कमधील रहिवाशांना घरे कधी देणार?

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 25 हजार लोकांना जमीन उपलब्ध करून पर्यायी घरे बांधून देण्याचे सरकारने आश्वासन दिले आहे. ही कार्यवाही लवकर पूर्ण करा. हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे या लोकांना कागदपत्रे जमा करायला सांगितले आहे. बहुतांश लोकांची कागदपत्रे जमा झालेली नाहीत. त्यासाठी दहा दिवसांची मुदत वाढवून देण्याची मागणी सुनील प्रभूंनी केली.