अधिवेशनानंतर दोन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार,शरद पवार यांचे संकेत

713

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. मात्र मंगळवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनानंतर पुढच्या दोनच दिवसांत होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार मंगळवारी सायंकाळी नागपुरात दाखल झाले.नागपुरात महाराष्ट्र विधान मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे दोन दिवस नागपूर मुक्कामी आहेत. विमानतळावरून पवार देवगिरी बंगल्यावर पोहोचले. येथे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात पवारांनी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. यानंतर ते प्रेस क्लब येथे पोहोचले. येथे राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांशी त्यांनी बंदद्वार चर्चा केली. या बैठकीदरम्यान शरद पवार यांनी अधिवेशनानंतर पुढील दोन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. त्याचप्रमाणे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत चर्चा करूनच धोरण आखण्याबाबत सूचना दिल्या.

शरद पवार बुधवारीही दिवसभर नागपुरात विदर्भातील नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या निवासस्थानीही भेटी देणार आहेत. सायंकाळी 5़30 वा. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शरद पवार यांच्या हस्तेच हा सत्कार होणार आहे.

एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर?
शरद पवार यांच्या या नागपूर भेटीत एकनाथ खडसे हेदेखील त्यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. भाजपात नाराज असलेले एकनाथ खडसे हे मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या