राष्ट्रवादीच्या विलीनीकरणापूर्वी आमच्याशी चर्चा करावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चांवर भाष्य करत स्पष्ट केले की, अजित पवार अशा कोणत्याही चर्चा करत असतील, तर त्या भाजपशी चर्चा केल्याशिवाय होऊ शकत नाहीत. जर अशा चर्चा झाल्या असतील तर त्या भाजपशी झाल्या असतील, अन्यथा तो वेगळा मुद्दा आहे, असे त्यांनी सांगितले.

फडणवीस म्हणाले की, विलिनीकरण करायचे की नाही, चर्चा करायची की नाही, हा निर्णय पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. मात्र आमची अपेक्षा एवढीच आहे की कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमच्याशी एकदा चर्चा करावी. तसे ते आतापर्यंत करत आले आहेत आणि पुढेही करतील.

अजित पवार अशा चर्चा करत होते, तर त्या एनडीएतून बाहेर पडण्यासाठी होत्या का? किंवा सरकारमधून बाहेर पडण्याच्या संदर्भात होत्या का? असा प्रश्न उपस्थित करत फडणवीस म्हणाले की, अजित पवार सरकारमध्ये स्थिर होते. त्यामुळे रोज नवनव्या अफवा पसरवून संभ्रम निर्माण करणे आणि खालच्या पातळीचे राजकारण करणे योग्य नाही.

ते पुढे म्हणाले की, आज वस्तुस्थिती अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन वेगळे पक्ष अस्तित्वात आहेत. एक पक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आहे, तर दुसरा पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की पक्षाचे नेतृत्व सुनेत्रा पवार यांनी करावे आणि त्यानुसार त्यांनी शपथविधी केला. हा निर्णय पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे.

भाजपची भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट असल्याचे सांगत फडणवीस म्हणाले की, आमचे साथीदार कोण आहेत, हे स्पष्ट आहे – अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आमच्या सहकाऱ्यांनी जो निर्णय घेतला, त्या निर्णयाच्या पाठीशी उभे राहणे ही आमची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आम्ही कालही पार पाडली, आजही पार पाडतो आणि पुढेही पार पाडू.

इतिहासाचा संदर्भ देताना फडणवीस म्हणाले की, इंदिरा गांधी यांच्या दुर्दैवी हत्येनंतर काँग्रेस पक्षाने परिस्थिती पाहून राजीव गांधी यांना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचप्रमाणे, परिस्थितीनुसार राजकीय पक्ष निर्णय घेत असतात आणि तसाच निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे.

ते पुढे म्हणाले की, जर कोणतीही चर्चा अंतिम टप्प्यावर गेली असती, किंवा एखादी तारीख ठरली असती, तर अजित पवारांनी आम्हाला नक्कीच सांगितले असते. ते सरकारमध्ये असताना, आमच्याशी चर्चा न करता असा कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे पवार साहेबांमध्ये किंवा इतर कोणामध्ये काय चर्चा झाली, याची मला माहिती नाही. आमच्या माहितीनुसार अशा कोणत्याही तारखेची माहिती आम्हाला देण्यात आलेली नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.