न्यूयॉर्कच्या इंडिया परेडमध्ये महाराष्ट्र ढोलाचा आवाज घुमला. मराठी मंडळ डेट्रॉईटच्या शिलेदार ढोलताशा पथकाने केलेल्या जबरदस्त सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. 15 ऑगस्टनंतर येणाऱ्या रविवारी अमेरिकेत ‘इंडिया डे’ साजरा करण्याची परंपरा आहे. यंदाच्या 42 वा इंडिया डे न्यूयॉर्कच्या मॅनहटन येथे उत्साहात साजरा झाला.
संपूर्ण अमेरिकेतून एक लाखाहून अधिक भारतीय हा उत्सव अनुभवण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये जमा झाले होते. रविवारी सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या सुमारे दीड किलोमीटर लांबीच्या मिरवणुकीची तब्बल सहा तासांनी सांगता झाली. फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांसह प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी, सोनाक्षी सिन्हा, मनोज तिवारी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. ढोलपथकाचे नेतृत्व मूळ नाशिककर असणाऱ्या प्रणव औंधकरने केले. प्रणवने ऋतुजा कांबळे, सुरेखा पोकळे, प्रांजली आढाव, साईनाथ जाधव, अमृता पळशीकर, आदित्य दांडेकर, अंकिता दांडेकर, युवान वायकोळे, विहान जोशीआदींच्या समर्थ साथीने साठहून अधिक वादकांसह आसमंत दणाणून सोडला.
जय भवानी, जय शिवराय!
हिंदुस्थानींसह उत्सव बघण्यास आवर्जून आलेले अमेरिकन्स व इतर देशांच्या पेक्षकांनीही ‘जय भवानी, जय शिवराय’च्या घोषणा देऊन आसमंत दणाणून सोडला. जवळजवळ दीडशे अमेरिकन वाहिन्या व शेकडो व्लागर्सनी सोहळय़ाचे थेट प्रक्षेपण केले.