
महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून राज्य ड्रग्जच्या विळख्यात अडकले आहे. गेल्या वर्षभरात ड्रग्जसंदर्भात 13 हजार 954 गुन्हे नोंद करण्यात आले असून तब्बल 10 हजार 686 जणांना अटक झाल्याची आकडेवारीच शिवसेना आमदार ऍड. अनिल परब यांनी आज विधान परिषदेत सादर केली. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असून ड्रग्जमुळे तरुण पिढी बरबाद होत असल्याचे ते म्हणाले.
विधान परिषदेत आज ‘259 अंतिम आठवडा प्रस्तावा’वर बोलताना शिवसेना आमदार ऍड. अनिल परब यांनी गृह खात्याच्या अकार्यक्षमतेवर जोरदार टीका केली. ड्रग्ज, गुटखा, अमली पदार्थांची तस्करी रोखण्यात गृह खाते सफशेल फेल ठरल्याचे सांगत त्यांनी आकडेवारी सादर केली. मुंबईत हा प्रश्न अत्यंत गंभीर बनत चालला आहे. मुंबईत ड्रग्जचे 1141 गुन्हे दाखल झाले असून 857 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. यावरून हा प्रश्न किती गंभीर बनत चालला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. रस्त्याच्या पानटपरीवरदेखील हे ड्रग्ज मिळत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. याची गृह खात्याने गंभीर दखल घेऊन मुंबई आणि महाराष्ट्राला ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी कार्यवाही करावी. नुसते गुन्हे दाखल न करता कायद्याच्या कठोर अंमलबजावणीनंतर यातील आरोपींवर जरब बसणारी कारवाई करावी, अशी मागणीही या वेळी त्यांनी केली. या प्रस्तावावर बोलताना शिवसेनेचे सचिन अहिर, ज.मो. अभ्यंकर, राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे, अभिजित वंजारी यांनीदेखील राज्यातील वाढलेल्या अत्याचाराच्या घटना, ड्रग्जचा प्रश्न, शिक्षण, बेरोजगारीबाबत सरकारच्या कामगिरीवर सवाल उपस्थित केले.
पाच वर्षांच्या कारवाईची श्वेतप्रत्रिका काढा!
ड्रग्ज प्रकरणासह गुन्हेगारी, अपहरण, महिलांवरील अत्याचार आदी प्रकरणांमध्ये सरकारने गेल्या काय कारवाई केली, एसआयटी नेमलेल्या प्रकरणांमध्ये किती गुन्हे दाखल करून कारवाई केली, याबाबत पाच वर्षांची श्वेतपत्रिका काढा अशी मागणीही आमदार अनिल परब यांनी केली. केवळ छोटय़ा लोकांना पकडून कारवाईचा दिखावा न करता व्यापक कारवाई करून मुळापर्यंत जाऊन राज्याला ड्रग्जच्या विळख्यातून सोडवा, अशी मागणीही त्यांनी केली.



























































