शिवसेनेच्या विजयाचा निश्चय करणारा विक्रोळी विधानसभेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा कांजूरमार्गमध्ये मोठ्या दणक्यात पार पडला. यावेळी शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिवसेना आमदार सुनील राऊत यांना तिसऱ्यांदा विधानसभेवर पाठवण्याचा निर्धारच यावेळी विक्रोळी विधानसभेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.
विक्रोळी विधानसभेच्या गटप्रमुख महिला, पुरुष, उपशाखाप्रमुख, शाखाप्रमुख यांचा हा मेळावा कांजूरमार्गच्या पणजीवाडी हॉलमध्ये आयोजित करण्यात आला. यावेळी बोलताना शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी मिंधे आणि भाजपच्या गद्दारी आणि फसवणुकीचा पर्दाफाशच केला. शिवसेनाप्रमुखांचा जेव्हा मतदानाचा हक्क डावलण्यात आला त्यावेळी पेंद्रात भाजपचेच सरकार होते, याची आठवण त्यांनी करून दिली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच हिंदुत्वाच्या नावावर भाजप देशाच्या गादीवर बसू शकला, असे ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर शिवसेना आमदार सुनील राऊत, आमदार रमेश कोरगावकर, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, माजी महापौर दत्ता दळवी, महिला विधानसभा संघटिका राजेश्वरी रेडकर आदी उपस्थित होते.
लाडक्या बहिणीचा भाऊ लबाड!
भाजपने सत्तेत येताना 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात टाकण्याचे आश्वासन दिले होते, मात्र लोकांची फसवणूक केल्यानंतर आता पंधराशे रुपये देऊन लाडक्या बहिणीची बोळवण करीत असल्याचा टोला भास्कर जाधव यांनी लगावला. पंधराशे रुपयांच्या बदल्यात लाडक्या बहिणीचे मत विकत घेण्याचा हा प्रकार आहे. चारशेचा गॅस सिलिंडर बाराशेवर नेला, अशी योजना काय कामाची, असा सवाल करीत लाडका भाऊ लबाड असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.