निवडणूक आयोगाचा घोळ सुरूच! महानगरपालिका निवडणुकांसाठी १ जुलैपर्यंतची मतदारयादी वापरणार

विधानसभा निवडणुकीत आणि आता होत असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत मतदारयांद्यांमध्ये मोठा घोळ समोर आला. दुबार नावे अनेक ठिकाणी आढळून आली. यासह मतदारयाद्यांमधील इतरही घोळ समोर आला. विरोधी पक्षांनी हा मुद्दा निवडणूक आयोगापर्यंत नेला. मतचोरी आणि मतदार याद्यांमधील घोळाबद्दल सर्वपक्षीय महामोर्चा काढण्यात आला होता. तसेच मतदारयाद्यांमधील घोळ दूर केल्याशिवाय महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका घेऊ नये, अशी मागणी केली होती. पण त्यानंतरही महानगरपालिका निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने सुधारीत मतदारयादी जाहीर केलेली नाही. यामुळे निवडणूक आयोगाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.

राज्य निवडणूक आयोगाने आज २९ महानगरपालिका पालिकांच्या निवडणुकांच्या घोषणा केली. या निवडणुकांसाठी पुढच्या महिन्यात १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. पण या निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने मतदारयाद्यांमधील घोळ दूर करून त्यात सुधाराव्यात अशी मागणी महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आणि मनसे या पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर सुधारीत अंतिम मतदारयाद्या या १५ डिसेंबरपर्यंत आयोगाच्या वेबसाईटवर जाहीर केल्या जातील असे निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले होते. पण आता त्यावर निवडणूक आयोगाचा पुन्हा सावळा गोंधळ दिसून आला आहे.

महानगरपालिका निवडणुकांसाठी 1 जुलै २०२५ पर्यंतची मतदारयादी वापण्यात येणार आहे. ही यादी प्रभागनिहाय विभाजीत करण्यात आलेली आहे. ही मतदारयादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेतलेली असल्याने या मतदारयादीत कुठलेही नाव डिलिट करणे किंवा कुठलेही नाव त्यामध्ये समाविष्ट करणे याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाहीत. मात्र, चुकीने एका प्रभागातील मतदाराचे नाव दुसऱ्या प्रभागात गेले असेल ते बदल करण्याचे अधिकार आहेत. टंकलेखनातील किंवा लेखनिकांच्या काही चुका असतील त्यासुद्धा दुरुस्त करण्याच अधिकार आहेत. आणि विधानसभेच्या मतदारयादीत नाव आहे मात्र प्रभागनिहाय मतदारयादीत नाव नाहीये त्या नावांचा समावेश करण्याचे अधिकार आहेत. या निवडणुकीसाठी संभाव्य दुबार मतदारांची ओळख केलेली आहे. आणि संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार मार्क करण्यात आलेला आहे. संभाव्य दुबार मतदारांच्या संदर्भात जी प्रक्रिया आहे की महापालिका आयुक्तांच्या मार्फत संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलेले आहे. त्यामध्ये दुबार मतदारांना विचारून तो कुठल्या मतदार केंद्रावर मत देईल, यासंदर्भात त्याच्याकडून लिहून घेण्यात आलेले आहे. त्या मतदान केंद्राच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही मतदान केंद्रावर त्याला मतदान करू दिले जाणार नाही. काही मतदार ज्यांनी या मोहिमेला प्रतिसाद दिलेला नाही. ते जर मतदान करण्यासाठी आले आणि त्यांचं संभाव्य दुबार मतदार म्हणून नोंद आहे तर त्यांच्याकडून हमीपत्र घेतले जाईल. आणि त्याची ओळख पटल्यानंतरच त्याला मतदान करता येईल. संभाव्य दुबार मतदार हे काही महापालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून आले. उदा. मुंबई महापालिकेत साधारणतः ११ लाखाच्या जवळपास संभाव्य दुबार मतदार होते. मात्र, मुंबई महापालिकेने यासाठी सॉफ्टवेअरचं एक टुल डेव्हलप केलं. आणि त्या सॉफ्टवेअर टुलच्या माध्यमाने आणि फिल्ड व्हेरिफिकेशनच्या माध्यमाने त्यांची जी संभाव्य दुबार मतदारांची यादी आहे ती असेसमेंटप्रमाणे फक्त ७ टक्के त्यांना प्रत्यक्ष दुबार मतदार आढळून आले. थोड्याफार फरकाने इतही महापालिकांमध्ये अशीच परिस्थिती आहे, असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत सारवासारव केली आहे. मुंबई महापालिकेच्या संदर्भातील मतदारयाद्यांमध्ये टेक्निकल इश्यू होता. तो टेक्निकल इश्यू दूर करण्यात आला आहे. आता मतदारयाद्यांमध्ये कुठल्याही प्रकारे टेक्निकल इश्यू राहिलेला नाही. आणि मतदारयांद्याबाबत कुठल्याही प्रकारचा घोळ नाहीये. आणि जो थोडाफार इश्यू होता तो आम्ही दूर केलेला आहे. राजकीय पक्षांना मतदारयाद्यांच्या प्रति आजच उपलब्ध केल्या जातील, असे उत्तर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना दिनेश वाघमारे यांनी दिले.