बंद दाराआडची चर्चा उघड करणार नाही! अमित शहांचा पवित्रा

2470
amit-shah

भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज आपले मौन सोडले. मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी काय बोलणे झाले याबद्दल शहा यांना विचारले असता ‘बंद दाराआड झालेली चर्चा उघड करणार नाही.’ असा पवित्रा त्यांनी घेतला.

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात 18 दिवस सत्तास्थापनेचा पेच कायम होता. कोणत्याही पक्षाला बहुमत दाखवता न आल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली. परंतु त्या सर्व घडामोडींदरम्यान अमित शहा यांनी अवाक्षरही काढले नव्हते. आज त्यांनी एका टीव्ही वाहिनीला मुलाखत दिली.

महाराष्ट्रात शिवसेना-भाजप महायुतीची सत्ता आल्यास देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मी आणि स्वतः फडणवीस यांनी जाहीर सभांमध्ये केली होती. परंतु त्यावेळी कुणीही आक्षेप का घेतला नाही असा सवाल शहा यांनी केला. शिवसेनेची 50-50 टक्क्यांची मागणी चुकीची आहे असे सांगणाऱ्या शहा यांनी काय फॉर्म्युला ठरला होता हे मात्र उघड करायचे टाळले. विधानसभेचा निकाल लागल्यानंतर राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी 18 दिवस दिले होते पण सत्तास्थापनेसाठी इतके दिवस कुठेही लागले नव्हते असे शहा यांनी सांगितले. ज्यांच्याकडे 145 चा आकडा आहे त्यांनी सत्ता स्थापन करावी असे सांगतानाच राष्ट्रपती राजवटीबद्दल विरोधक राजकारण करत आहेत असे शहा यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या