योग्य वेळी निर्णय कळेलच!

1202

काँग्रेससोबत चर्चा योग्य दिशेने सुरू असून योग्य वेळी निर्णय होईल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे सांगितले. ‘ट्रायडेंट’ हॉटेल येथे काँग्रेस नेत्यांसोबत उद्धव ठाकरे यांची सुमारे तासभर चर्चा झाली यावेळी ते बोलत होते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि माणिकराव ठाकरे यांच्यासोबत अत्यंत सकारात्मक चर्चा झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी नमूद केले. आणखीही चर्चेच्या फेऱ्या होतील व चर्चेअंती जो निर्णय होईल तो योग्य वेळी सर्वांना कळेल अशी सूचक प्रतिक्रियाही उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.

पुन्हा शिवसेनेशी बोलू- काँग्रेस

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुंबईला आले होते. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यांची एकत्र बैठक झाली. या बैठकीत दोन्ही पक्षांच्या सहमतीने पुढे जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर शिवसेनेशी आम्हाला बोलणी करायची होती त्यानुसार आज आम्ही उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. कालच्या पार्श्वभूमीवर ही एक सदिच्छा भेट होती. आता काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा एकत्र बैठक करू. या बैठकीत काही मुद्दय़ांवर चर्चा होईल. त्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेशी बोलणी केली जातील, असे बैठकीविषयी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या