
मुंबई विमानतळ परिसरात रमजानच्या नमाजला परवानगी दिल्यास येथील सुरक्षेला धोका होऊ शकतो, असा दावा राज्य शासनाने गुरुवारी उच्च न्यायालयात केला.
विमानतळ परिसरात हजारो प्रवाशांची ये-जा असते. येथे नमाजसाठी परवानगी मागणाऱया रिक्षा-टॅक्सी चालकांची संख्या दोन हजार आहे. नमाजला परवानगी दिल्यास नमाज करणाऱयांकडे लक्ष द्यावे की प्रवाशांची सुरक्षा बघावी, असा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे येथे नमाजला परवानगी देता येणार नाही, असे सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.
न्या. बी. पी. पुलाबावाला व न्या. फिरदोश पुन्नीवाला यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. विमानतळ परिसरापासून काही अंतरावर तीन मशीद आहेत. तेथे नमाजसाठी जाता येईल, असे विमानतळ प्रशासनाने खंडपीठाला सांगितले. मात्र या रिक्षा-टॅक्सी चालकांच्या नमाजासाठी येथे तात्पुरती शेड बांधण्यास परवानगी देण्याचा विचार करण्यात यावा, अशी सूचना न्यायालयाने केली.



























































