ऍन विनिंग इन पॅरिस! कोल्हापूरच्या पठ्ठय़ाने जिंकले, मराठमोळय़ा स्वप्नील कुसाळेचा अचूक लक्ष्यभेद

>> मंगेश वरवडेकर

तब्बल 72 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये ‘जय महाराष्ट्र’चा आवाज घुमला. कोल्हापूरच्या मऱहाटमोळय़ा स्वप्नील कुसाळेने नेमबाजीच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात हिंदुस्थानला तिसरे कांस्यपदक जिंपून दिले. एवढेच नव्हे तर गेली 72 वर्षे पदकांविना परतत असलेल्या महाराष्ट्राचे वैयक्तिक पदकाचे स्वप्न साकार केले. 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानला पहिलेवहिले वैयक्तिक पदक जिंकून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर स्वप्नील ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा दुसराच महाराष्ट्रवीर ठरला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

आज शूटिंग स्टेडियममध्ये चमत्कार घडला. स्वप्नील कुसाळे पदक जिंकेल असे पुणाला स्वप्नातही वाटले नव्हते. तो दावेदारही नव्हता. तसाच तो पहिल्या पाचातही नव्हता. डार्पहॉर्स तर मुळीच नव्हता. पण त्याने इतिहास घडवणारा पराक्रम रचला. नेमबाजीत हिंदुस्थानला तिसरे पदक जिंकून देण्याचा पराक्रम करत नेमबाजांचा आवाज पुन्हा एकदा घुमवला. स्वप्नीलच्या आधी मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर मनूने सरबज्योत सिंगच्या साथीने 10 मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारात कांस्यपदकाचा डबल धमाका केला. आता स्वप्नीलने हिंदुस्थानला तिसरे कांस्यपदक जिंकून दिले.

ऑलिम्पिक इतिहासात एकाच खेळात तीन पदके जिंकण्याची ही हिंदुस्थानी नेमबाजांची पहिलीच वेळ आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

खाशाबांनंतर 72 वर्षांनी महाराष्ट्राला ऑलिम्पिक पदक

ऑलिम्पिकच्या इतिहासात कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर स्वप्नील कुसाळे हा पदक जिंकणारा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला. खाशाबांनी 1952च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये पुस्तीत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले होते. यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाज स्वप्नील पुसाळेनेही कांस्यपदक जिंपून 72 वर्षांनंतर महाराष्ट्राची पताका फडकावली. खाशाबा जाधव हे सातारा जिल्ह्यातील गोळेश्वर (ता. कराड), तर स्वप्नील कुसाळे हा कोल्हापूर जिल्ह्यातील कांबळवाडी (ता. राधानगरी) या छोटय़ा खेडेगावातील आहे. मात्र, ही दोन्ही खेडी ऑलिम्पिकच्या नकाशावर झळकली, हे विशेष.

स्वप्नीलचा आदर्श धोनी

स्वप्नील कुसाळेने नेमबाजी क्रीडा प्रकारात देशाला ऑलिम्पिक पदक जिंपून दिले असले तरी त्याचा आदर्श हा हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे. धोनीच्या मैदानातील शांत आणि संयमी स्वभाव शैलीचा आपल्यावर कमालीचा प्रभाव असल्याचे स्वप्नीलने सांगितले. तो म्हणाला, ‘अचूक नेमबाजीसाठी शांत आणि संयम या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच मी धोनीचा प्रचंड चाहता आहे. क्रिकेटच्या मैदानावर सामना सुरू असताना कितीही मोठे दडपण असले तरी धोनीचा संयम सुटलेला कधीही पाहिला नाही. मलाही असेच राहणे आवडते,’ असेही स्वप्नीलने सांगितले.

आनंद पोटात माझ्या माईना!

स्वप्नील कुसाळेच्या कांबळवाडीतील घरी आई-वडील, आजी अन् भाऊ इतर नातेवाईक आणि गावकरी टीव्हीवर पोराचा पराक्रम बघत होते. नातवानं ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर स्वप्नीलचे आई-वडील अन् आजी यांनी आनंदाश्रूंना वाट करून दिली. भावाचा जल्लोषही बघण्यासारखा होता. स्वप्नीलची आजी म्हणाली, ‘लय चांगलं झालं.. म्हाया नातवानं करून दावलं, माझा नातू लय मोठ्ठा झाला… आमचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी हाय… लहानाचा मोठ्ठा झालाय, लहानपणापासून बाहेर गेलाय, लय चांगलं झालं.’ पुढे बोलताना स्वप्नील आल्यानंतर त्याचं कौतुक कसं करणार, असं आजींना विचारल्यानंतर, त्याचे मुके घेऊन कौतुक करणार असल्याचं आजीनं सांगितलं.

मुलाच्या कामगिरीचा अभिमान!

स्वप्नील कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानला कांस्यपदक जिंकून पदक पटकावल्यानंतर त्याच्या आई- वडिलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे म्हणाले, 12-13 वर्षांची स्वप्नीलची तपश्चर्या आज फळाला आली. त्याच्यासाठी आमच्या कुटुंबानेही खूप मोठी तपश्चर्या केली आहे. हिंदुस्थानचा तिरंगा तो खाली पडू देणार नाही, याची खात्री होती. तो ऑलिम्पिकमध्ये तिसरा आला असला तरी त्याने देशाचा तिरंगा सातासमुद्रापार फडकावल्याचा मला अभिमान आहे. स्वप्नीलच्या आई अनिता पुसाळे यांनीही लेकाचा लई अभिमान असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी स्वप्नीलचे संपूर्ण कुटुंब भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

राज्य सरकारकडून एक कोटीचे बक्षीस जाहीर

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकुन इतिहास घडविणारा महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याचे राज्य सरकारने अभिनंदन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलला राज्य शासनाच्या वतीने एक कोटी रुपयांचे बक्षीसही जाहीर केले. मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडीओ कॉलवर स्वप्नील कुसाळे, त्याचे कुटुंबीय व प्रशिक्षक दीपाली देशपांडे या सर्वांचेही अभिनंदन केले.

आता टीसी नव्हे, रेल्वे ऑफिसर

हिंदुस्थानला कांस्यपदक जिंकून देणारा स्वप्नील कुसाळे हा मध्य रेल्वेच्या पुणे विभागात टीसी म्हणून काम करतोय. यामुळेच मध्य रेल्वेसाठी ही गर्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस स्वप्नील हा पॅरिसहून मायदेशात परत येईल त्यावेळेस हिंदुस्थानी रेल्वेकडून त्याचा यथोचित सन्मान केला जाईल आणि ताबडतोब त्याला ऑफिसर म्हणून प्रमोशन देण्यात येणार आहे, अशी घोषणा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी केली.

एकएका गुणासाठी रंगला पाठशिवणीचा खेळ

कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेने पात्रता फेरीत सातव्या स्थानी राहत बुधवारी फायनलमध्ये धडक दिली होती. त्याने गुरुवारी आठ खेळाडूंच्या अंतिम फेरीत जराही विचलित न होता एकाग्रचित्ताने खेळ केला. पहिल्या चार शॉटमध्ये 50.8 गुणांसह स्वप्नील सहाव्या स्थानी होता. एकएका गुणासाठी सर्व नेमबाजांमध्ये पाठशिवणीचा खेळ रंगला होता. स्वप्नीलने हळूहळू 206 गुणांपर्यंत मजल मारत पाचव्या स्थानापर्यंत प्रगती केली. स्वप्नीलच्या खात्यात 310.1 गुण जमा होते, तेव्हाही तो पाचव्याच स्थानी होता. एलिमिनेटर फेरीपर्यंत 361.2 गुणांसह स्वप्नीलने चौथ्या स्थानी झेप घेतल्यानंतर त्याने पदकाच्या आशा पल्लवीत केल्या. मग 411.6 गुणांसह त्याने तिसरे स्थान काबीज केले. 451.4 गुणांसह तिसऱ्या स्थानावरून स्वप्नील एलिमिनेट झाला अन् हिंदुस्थानच्या गुणतक्त्यात नेमबाजीतील तिसरे कांस्यपदक जमा झाले. चीनच्या लियू युपुनने सर्वाधिक 463.6 गुणांची कमाई करीत सुवर्णपदकावर नाव कोरले, तर युव्रेनच्या सिरही पुलिशला 461.3 गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.