घर बांधणाऱ्यांसाठी खूशखबर, घरकुलांसाठी मिळणार पाच ब्रास मोफत वाळू

राज्य सरकारने घराचे बांधकाम करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. घरकुलांसाठी पाच ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे घरकुल बांधणाऱ्या लाखो लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

आठवडाभरात सर्वसमावेशक वाळू धोरण मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार आहे. राज्यात ज्या ठिकाणी लिलाव झालेले नाही आणि ज्या ठिकाणी आम्हाला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळाला आहे अशा ठिकाणी घाट सुरू करण्याचा निर्णय नवीन वाळू धोरण मंजूर झाल्यानंतर घेतला जाणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

स्टोन क्रशरला प्रोत्साहन

एकंदरीत जेवढी मागणी असेल तेवढा पुरवठा असे वाळू धोरण आपण तयार करत आहोत. त्यासाठी एम सॅण्ड धोरण येत आहे. त्यामध्ये दगड खाणींमधून येणाऱ्या वाळूसाठी आम्ही प्रत्येक जिह्यामध्ये स्टोन क्रशरसाठी प्रोत्साहन देत आहोत. त्या माध्यमातून दगडापासून मोठ्या प्रमाणात वाळू तयार होणार असून त्यामुळे नदीतील वाळूची मागणी कमी होईल.