सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यासह देशभरात संतापाची लाट उसळली. जनतेचा महायुती सरकारविरोधातील रोष उफाळून आला. या कामातही भ्रष्टाचार केल्यानेच पुतळा कोसळल्याची भावना जनतेने व्यक्त केली. आता याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पहिल्यांदाच मत व्यक्त केले आहे. हा पुतळा का कोसळला, याचे कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे.
पुतळा उभारताना त्यात स्टेनलेस स्टीलचा वापर झाला असता तर तो पुतळा पडला नसता, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात कोणतेही बांधकाम करताना त्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर होणे गरजेचे आहे. सुमद्रकिनारी होणाऱ्या बांधकांना गंज लागतो, त्यामुळे त्याचे आयुर्मान कमी होते. स्टेनलेस स्टीलला गंज लागत नाही. त्यामुळे त्यात गंजण्याचा धोका नसतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपूलांसाठी स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात यावा, यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईत जेव्हा 55 उड्डाणपूल बांधले तेव्हा मी एका माणसासोबत फेरफटका मारत होतो. तेव्हा त्याने मला उड्डाणपूलासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडावर पावडर कोटिंग वापरण्यात आल्याचे दाखवले होते. या पावडर कोटिंगमुळे लोखंड गंजणार नाही, असा दावा त्याने केला होता. मात्र, नंतरच्या काळात मुंबईतील उड्डाणपूलांसाठी वापरण्यात आलेल्या लोखंडाला गंज लागला. त्यामुळे आता मला असे वाटते की, समुद्रकिनाऱ्यापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या भागात रस्त्यांचे बांधकाम करताना स्टेनलेस स्टीलचाच वापर करण्यात यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या 28 फुटी ब्राँझचा पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याच्या जोडणीसाठी वापरण्यात आलेले नटबोल्ट गंजल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे या पुतळ्याच्या उभारणीसाठी स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात आला असता तर तो पुतळा पडला नसता, असे मत त्यांनी व्यक्त केले.