हिंमत असेल तर भाजपबाबत बोला; जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला सुनावले

लोकसभा निवडणुक झाल्यानंतर आता राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपने अजित पवार गटाला सोबत घेतल्याचा त्यांना फटका बसला, असे आरएसएसने म्हटले आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटला चांगलेच सुनावले आहे. अजित पवार गटाला बाजूला करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. अजित पवार यांचे कार्यकर्ते जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत बोलत असतात. हिंमत असेल तर त्यांनी भाजपबाबत बोलावे, असे जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला सुनावले आहे.

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका होते, त्यावेळी कुणीही मोठा व्यक्ती असला तरी, त्यांच्यावरही मी टीका करतो. मी साहेब रागावतील याचा देखील कधी विचार करत नाही. आता महाराष्ट्रात मागील 4 दिवसांपासून त्यांना भाजप घेरत आहे. मात्र, कुणीही याबाबत बोलत नाही. हे किती भयानक आहे. माझ्या बॉसवर कुणीही बोलणार असेल, तर मी त्यांना सोडत नाही, असेही आव्हाड म्हणाले आहेत.

भाजप राज्यातील पराभवाला अजित पवार गटाला जबाबदार धरत असतील तर, भाजपला उत्तर प्रदेशमध्ये कमी जागा आल्या, तिथेही एखादा अजित पवार गट होता का, असा सवालही आव्हाड यांनी केला आहे. आधी अजित पवार गटाने स्वतःकडे पाहावं. कोण गजा मारणे बरोबर चहा प्यायला गेलं होतं ते पाहा. जिनके घर शिशेके होतें हैं, वो दुसरों के घरोपर पत्थर नहीं मारा करते. अजित पवार यांना बाजूला करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. चारी बाजूने त्याच्यावर हल्ले केले जात आहेत, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.