बदलापूरमध्ये एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्यानंतर जनतेचा उद्रेक झाला. या घटनेविरोधात जनतेने रस्त्यावर उतरत आंदोलन केले. बदलापूरच्या घटनेबाबत आणि पोलीस आणि प्रशासनाने केलेल्या विलंबाबाबत सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ही घटना आणि त्यानंतर जनतेचे आंदोलन याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत आता राज्यात परिवर्तन अटळ असल्याचे म्हटले आहे.
बदलापूमधील शाळेतील मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन करण्यात आले. जनतेने स्वंयस्फूर्तीने अन्यायाविरोधात लढा देत रस्त्यावर उतरले आहेत. याचाच अर्थ असा की, लोकांना आता परिवर्तन हवं आहे, असे शरद पवार म्हणाले. लोकं रस्त्यावर येतात, दळणवळण थांबवतात, लोकांनी अन्यायाविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. बदलापूरच्या घटनेमधून हेच दिसून आले आहे, याचा अर्थ एकच की आता जनता शांत बसणारी नाही, जनतेला परिवर्तन हवं आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
जनमानसाची भावन वेगळी असते. महाराष्ट्रात लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची 4 आणि काँग्रेसची फक्त एकच जागा होती. आता झालेल्या लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीने एकत्र येत लढा दिली. जनतेने 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीला दिल्या. यातूनच महाराष्ट्रातील जनतेला परिवर्तन हवं होते, हे दिसून येते. आताही जनतेने त्यांचा रोष आणि अन्यायाविरोधातील संतपा व्यक्त केला आहे. जनतेतील या असंतोषातच विधानसभा निवडणूक होणार आहे. राज्यभरात महायुतीविरोधातील जनतेचा रोष स्पष्ट होत आहे. लोकांना बदल पाहिजे. एखाददुसरा गंभीर प्रसंग आला, तर लोकांची प्रतिक्रिया किती तीव्र असते, हे बदलापूर येथे दिसून आले. हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर येतात, दळणवळण थांबवतात. याचा अर्थ लोकांमध्ये खूप अस्वस्थता आहे आणि त्यांना परिवर्तन हवं आहे, असेही शरद पवार म्हणाले.