पुण्यात ‘महाराष्ट्र प्रीमियर लीग’चा थरार बुधवारपासून, 4 एस पुणेरी बाप्पा, पुणे वॉरियर्सचा संघ स्पर्धेसाठी सज्ज

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर येत्या 4 जूनपासून महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) व वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग (डब्ल्यूएमपीएल) या स्पर्धांचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेतील ‘एमपीएल’चा 4 एस पुणेरी बाप्पा हा संघ, तर ‘डब्लूएमपीएल’चा पुणे वॉरियर्सचा संघ सज्ज झाला आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी ‘एमसीए’चे सचिव कमलेश पिसाळ, अपेक्स कौन्सिल सदस्य विनायक द्रविड, सुहास पटवर्धन, सुनील मुथा, कल्पना तापीकर, सुशील शेवाळे, सीईओ अजिंक्य जोशी, 4 एस पुणेरी बाप्पा संघाचे मालक आशीष देसाई, पुणे वॉरियर्स संघाचे मालक मणप्रीत उप्पल, आयकॉन खेळाडू रामकृष्ण घोष व यश क्षीरसागर, सातारा वॉरियर्स संघाचे मालक गौरव गढोक, आयकॉन खेळाडू अनुजा पाटील, पुणे वॉरियर्सची उपकर्णधार श्वेता माने यांसह महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रत्येक जिल्हा संघटनेला 75 लाखांचे अनुदान

यावेळी रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्र प्रीमियर लीगमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य कुटुंबातील अनेक नवोदित खेळाडूंना योग्य वेळी संधी मिळत आहे. या स्पर्धेमुळे त्यांच्यासाठी भविष्यातील अनेक दरवाजे उघडले आहेत. 4 एस पुणेरी बाप्पा संघाच्या जर्सीचे शनिवारी अनावरण करण्यात आले.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे (एमसीए) राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला क्रिकेटच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रत्येकी ७५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. जिल्हास्तरावर पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी, अनेक नवीन प्रतिभावान खेळाडू निर्माण करण्यासाठी एमसीए सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.

एमपीएलमध्ये 6, तर डब्लूएमपीएलमध्ये 4 संघ

यावर्षीच्या महाराष्ट्र प्रीमियर लीग व वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग लिलावासाठी एकूण 409 पुरुष खेळाडू आणि 249 महिला खेळाडू नोंदणीकृत होते, ज्यामधून संघमालकांनी आपापल्या संघाचा बॅलन्स व गरजांनुसार संघासाठी खेळाडूंची निवड केली. या हंगामात एमपीएलमध्ये 6 संघ आणि डब्लूएमपीएल मध्ये 4 संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण जिओ हॉटस्टार व स्टार स्पोर्ट्स 2 या वाहिन्यांवर करण्यात येणार आहे, ज्यामुळे ही स्पर्धा राज्यासह संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.

अजय शिर्के यांच्या नावाने क्रिकेट अकादमी

महाराष्ट्र क्रिकेट संघटना आगामी हंगामात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या धर्तीवर स्वतःची अकादमी सुरू करणार असून, ही अकादमी अजय शिर्के यांच्या नावाने पुण्यातच सुरू करण्यात येईल. त्यानंतर महाराष्ट्रात चार विभागीय अकादमी सुरू करण्यात येणार आहे. यामुळे क्रिकेटचा दर्जा उंचावण्यासाठी मदत होणार आहे.

सर्व सामान्यांसाठी मैदानात मोफत प्रवेश

इतर असोसिएशनच्या स्पर्धांमध्ये सामना पाहण्यासाठी तिकीट विकत घ्यावे लागते. पण एमसीएने मात्र सर्वसामान्य क्रिकेट रसिकांना सामन्यांचा आनंद आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर घेता यावा, म्हणून दरवर्षीप्रमाणे मोफत प्रवेश ठेवला आहे. मुबलक जागेत मोफत पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. तसेच सामान्यांसाठी पिण्याच्या पाण्याची मोफत सोय असेल. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पीएमसी, पीसीएमसी व इतर खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना हे सामने दाखविण्यासाठी सोय केली जाणार आहे.

दिमाखदार उद्घाटन सोहळा

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित एमपीएल आणि डब्ल्यूएमपीएल स्पर्धेचा उद्घाटन समारंभ बुधवार दि. 4 जून रोजी सायंकाळी होणार आहे. त्यामध्ये भव्य ड्रोन शो, सेलिब्रिटीजचे सादरीकरण व नंतर आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर फ्लड लाईटसमध्ये रत्नागिरी जेट्स आणि इगल नाशिक टायटन्स यांच्यातील टी-२० सामना रंगणार आहे.

‘एमपीएल ‘मधील सहभागी संघ

4 एस पुणेरी बाप्पा, पीबीजी कोल्हापूर टस्कर्स, रत्नागिरी जेट्स, इगल नाशिक टायटन्स, सातारा वॉरियर्स, रायगड रॉयल्स

डब्ल्यूएमपीएलमधील सहभागी संघ

पुणे वॉरियर्स, रत्नागिरी जेट्स, सोलापूर स्मॅशर्स, रायगड रॉयल्स