‘एमपीएल’च्या उद्घाटन सोहळ्याला हिंदी, इंग्रजीचा तडका! ‘एमपीएल’ला अभिजात दर्जाच्या मराठी भाषेचा पडला विसर

महाराष्ट्र प्रीमियर लीग अर्थात एमपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धा म्हणजे मराठमोळ्या खेळाडूंचं व्यासपीठ. मात्र, बुधवारी झालेल्या एमपीएलच्या उद्घाटन सोहळ्याला मराठी भाषेला डावलून हिंदी आणि इंग्रजी भाषेचा तडका देण्यात आला. गतवर्षी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मात्र, मराठमोळ्या क्रिकेटपटूंसाठी असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात समालोचनही मराठीत झाले नाही, ही गोष्ट नक्कीच महाराष्ट्राच्या अस्मितेला शोभणारी नाही.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीगची सुरुवात बुधवारी (दि.4) गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झाली. त्यापूर्वी झालेल्या तासाभराच्या उद्घाटन सोहळ्यात केवळ ‘झिंगाट’ या एकमेव मराठी गाण्याचा आवाज आला. मराठी प्रेक्षकवर्ग असलेल्या या कार्यक्रमात बाकी सर्व आवाज हा हिंदी आणि इंग्रजीचाच होता. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) आपल्या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात अभिजात दर्जा असलेल्या मराठी भाषेचा विसर पडल्याने सोशल मीडियावर त्यांच्यावर टिकेची झोड उडाली. समोर मराठी प्रेक्षक वर्ग असताना मराठीला डावलून हिंदी आणि इंग्रजी भाषेचेच वर्चस्व या कार्यक्रमावर दिसून आले. स्टेडियमवरील क्रिकेटप्रेमींमध्येही ही चर्चा सुरू होती. नशीब एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनी तरी मराठीतून भाषण केलं, अशी फिरकी घेत प्रेक्षकांनी कार्यक्रमानंतर स्टेडियम सोडले.