मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात बेफाम पावसाचे थैमान

मुंबईतील पूर्व उपनगरात शुक्रवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या होत्या. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पावसाने जोर धरल्याचे चित्र पाहायला मिळाले. गेले काही दिवस मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाने जरी विश्रांती घेतली असली तर उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचे थैमान सुरू होते. मराठवाड्याचा बहुतांश भाग आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात शनिवारीही मुसळधार पाऊस पडत होता. सलग काही दिवस पडणाऱ्या या पावसामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील धरणे तुडुंब भरली आहेत. जायकवाडी धरणही काठोकाठ भरत आले असून शुक्रवारी या धरणाचे सगळे दरवाजे उघडण्यात आले होते. इकडे मुंबईमध्येही शहराला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणं भरली असून मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

पंढरपूर आणि धाराशिवमध्ये तुफान पाऊस
धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश भागात शनिवारी पहाटे जवळपास अर्धा तास ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडला. सकाळ होईपर्यंत पावसाची रिपरिप सुरुच होती. सुखावणारी बाब ही आहे की दुष्काळी पट्ट्यातही चांगला पाऊस होत आहे. मात्र या पावसाने सर्वसामान्यांपुढे अडचणीही निर्माण केल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी रस्ते वाहतूक विस्कळीत झाल्याचे वृत्त हाती आले आहे. या पावसाचा फटका हा काढणीला आलेला खरीप पिकांना बसण्याची शक्यताही नाकारता येत नाहीये. पंढरपुरात सलग तीन दिवस चांगला पाऊस पडतोय. या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहात असून पाणी पुलावर, रस्त्यावर आल्याने शुक्रवारी रात्री पंढरपूर-पुणे आणि पंढरपूर सातारा महामार्गावरील वाहतूक बंद झाली होती. पंढरपूर पुणे रोडवरील भंडीशेगाव इथे पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली होती. वाहतूक बंद झाल्याने एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बराच त्रास सहन करावा लागला. पंढरपूर-सातारा रस्त्यावरील वाहतूकही शुक्रवारी संध्याकाळी बंद झाली होती.

मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात औसा उंबडगा रस्ता पूल पाण्याखाली गेल्याने बंद झाला होता. शुक्रवारी रात्री इथे पावसाने जोर धरला होता आणि पुढचे काही तास हा पाऊस असाच जोरदार कोसळत राहिला होता. या पावसाने सोयाबीनच्या पिकांना फटका बसला असून शेतकऱ्यांची हाताशी आलेली पिके वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात तीन मंडळात मध्यरात्री अतिवृष्टी झाल्याचे कळते आहे. कुरुंदा (93 मिमी), हयातनगर (89 मिमी), आंबा मंडळात (72 मिमी) पावसाची नोंद झाली आहे. लातूर जिल्ह्याप्रमाणेच हिंगोली जिल्ह्यातही कापणीला आलेल्या सोयाबीनला या पावसाचा फटका बसला आहे. शेतात गुडघ्याइतके पाणी साचल्याचे चित्र काही ठिकाणी पाहायला मिळत होते. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातही चांगला पाऊस होत आहे. आटपाडी तालुक्यातील भागात आजपर्यंतचा सर्वाधिक पाऊस झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. कृष्णा नदीतून वाहून जात असलेलं पाणी टेंभू योजनेच्या माध्यमातून तलाव, बंधाऱ्याकडे नेऊन ते तुडुंब भरण्यात आले होते. यामुळे शुक्रवारी झालेल्या पावसानंतर इथेही पूरपरिस्थिती निर्माण झाली. पावसामुळे आटपाडी मधील एका घराची भिंत कोसळून दोन चिमुरड्या सख्ख्या दबल्याचे कळते आहे.

आपली प्रतिक्रिया द्या