मुंबईतील पोलिसांना हक्काचे घर मिळणार, सरकारची विधानसभेत माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील कुर्ला नेहरूनगर येथील म्हाडा पोलीस वसाहतीसह पोलीस निवासस्थानांच्या पुनर्विकासाला गती देण्यात येत असून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक पावले उचलत आहे, अशी माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली.

1 जानेवारी 2026 रोजी शासन निर्णयाद्वारे पोलीस निवासस्थानांमध्ये राहणाऱया अधिकारी व कर्मचाऱयांना मालकी हक्काची घरे देता येतील का, याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीला सर्व कायदेशीर, तांत्रिक व आर्थिक बाबींचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून दोन महिन्यांत अहवाल अपेक्षित आहे, असे राज्यमंत्री भोयर म्हणाले. मुंबई पोलीस दलासाठी सुमारे 40 ते 45 हजार सेवा निवासस्थाने उभारण्याच्या दृष्टीने ‘मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पास 30 जानेवारी 2026 रोजी मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे.