
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात (एसटी) 17,742 ड्रायव्हर, कंडक्टर आणि अन्य कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर भरले जाणार आहेत. एसटीच्या ताफ्यात 8300 नव्या बसेस येणार आहेत. त्यासाठी ही कंत्राटी भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी विधान भवनात सोमवारी बैठक बोलावली होती. त्यानंतर आज त्यांनी नव्याने कंत्राटी भरती केली जाणार असल्याचे सांगितले. मुंबईत 30 स्लीपिंग कोच तसेच 170 वोल्वो बसेस लवकरच दाखल होतील, असेही सरनाईक यांनी सांगितले.
सामान्य प्रवाशांना उत्तम सेवा देणे हेच एसटीचे तसेच सर्व कर्मचाऱयांचे अंतिम उद्दिष्ट आहे. त्यामुळे काम करताना चालक-वाहकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन अडचणी, आगार स्तरावरील निर्णयप्रक्रिया तसेच शिस्तभंग कारवाईच्या बाबतीत न्याय्य आणि पारदर्शक पद्धतीने काम करण्याचे निर्देशही सरनाईक यांनी दिले.































































