सरकारविरोधात व्यापाऱ्यांचा 5 डिसेंबरला राज्यव्यापी बंद

maharashtra-traders-state-wide-strike-on-december-5-2025-against-government-policies

राज्यातील प्रमुख व्यापारी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात झालेल्या परिषदेत व्यापाऱ्यांनी कठोर भूमिका घेत सरकारला थेट इशाराच दिला. राज्यातील व्यापारी वर्गाच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ येत्या 5 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्रभर लाक्षणिक बंद पाळण्यात येणार असल्याची घोषणा आज व्यापारी संघटनांच्या राज्यव्यापी परिषदेत करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील जुने झालेले कायदे, राष्ट्रीय बाजार समितीवरील प्रस्तावित धोरणातील त्रुटी तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायद्यान्वये व्यापाऱ्यांवर होत असलेल्या वाढत्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील व्यापारी वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पूना मर्चंट्स चेंबर येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (मुंबई), फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेड, ग्रेन-राईस-ऑईलसीड मर्चंट्स असोसिएशन (मुंबई) आणि दि पूना मर्चंट्स चेंबर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिषदेत मुंबई, कोल्हापूर, सांगली, नाशिक, पंढरपूर आदी भागांतील 120हून अधिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.