
हवामान खात्याने अल-निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे या वर्षी मान्सूनचा पाऊस कमी पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. विशेष म्हणजे, या वर्षी प्रथमच धरणांतील पाणीसाठा जूनऐवजी थेट 31 ऑगस्टपर्यंत राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सातारा जिह्यासह संपूर्ण राज्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर मान्सून अनिश्चित व कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शासनाने पाण्याच्या काटकसरीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
सातारा जिह्यातील कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, धोम-बलकवडी यांसारखी धरणे आहेत. आगामी काळात पावसाचे प्रमाण घटल्यास या धरणांतील पाणीसाठय़ावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शासनाने पिण्याच्या पाण्यासाठी धरणांमधील पाणी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी हा साठा जूनपर्यंत पुरेल, अशा पद्धतीने नियोजन केले जात असे. मात्र, यंदा प्रथमच तो दोन महिने वाढवून ऑगस्ट अखेरपर्यंत राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे शेती, उद्योग व्यवसाय आणि इतर बाबींसाठी लागणाऱया पाणी वापरावर मर्यादा येण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः पाटबंधारेच्या योजनांद्वारे शेतीसाठी दिल्या जाणाऱया पाण्यावर निर्बंध येऊ शकतात. त्यामुळे शेतकऱयांना पिकांचे नियोजन बदलावे लागण्याची वेळ येऊ शकते. जास्त पाणी लागणाऱ्या ऊस पिकाऐवजी कमी पाण्यात येणाऱया पिकांकडे वळण्याचा सल्ला शेतकऱयांना दिला जात आहे.
अल-निनोमुळे पुढील काळ आव्हानात्मक
अल-निनोचा प्रभाव वाढल्यास पावसाचे प्रमाण कमी व अनियमित होते. याचाच परिणाम पुढील उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या रूपात दिसून येतो. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला असला, तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे तितकेच महत्त्वाचे आहे. शासन निर्णयामुळे सातारा जिह्यासाठी आगामी काळ आव्हानात्मक ठरणार आहे.






















































