मॉन्सूनची आगेकूच वेगात सुरू; लवकरच महाराष्ट्रात आगमन होणार

हवामान खात्याने यंदा मॉन्सून चांगला होणार असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच याआधी वर्तवलेल्या अंदाजानुसार मॉन्सून अंदमान आणि केरळमध्येही दाखल झाला आहे. आता मॉन्सूनची वेगाने आगेकूच सुरू असून लवकरच तो महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीला वेग आल्याने येत्या 3 ते 4 दिवसात मॉन्सून महाराष्ट्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर उष्णतेने त्रासलेल्या जनतेला थोडा दिलासा मिळणार आहे. मुंबईसह उपनगर आणि कोकणात आर्द्रता वाढल्याने उष्णतेसह घामाच्या धारा निघत आहेत.

मॉन्सूनच्या प्रवेशासाठी राज्यात अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे येत्या तीन-चार दिवसांमध्ये मॉन्सून कोकणात आणि त्यानंतर महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. राज्यात ढगाळ वातावरण असल्याने वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात काही ठिकाणी वळीवाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली आहे. दोन दिवसांपूर्वी मॉन्सून केरळमध्येच रेंगाळत होता. मात्र, त्याच्या पुढील वाटचालीस अनुकूल वातावरण तयार झाल्याने त्याची आगेकूच वेगात सुरू आहे. रविवारी मॉन्सूनने पुढील टप्पा गाठत तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटकचा काही भाग व्यापला आहे. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने महाराष्ट्रात येत्या तीन-चार दिवसांमध्ये दाखल होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

वाढत्या तापमानामुळे अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे येत आहेत. त्यामुळे आर्द्रता वाढण्यासोबत दमट व उष्ण वातावरण तयार झाले आहे. मात्र, आता लवकरच नागरिकांची या वातावरणातून सुटका होणार आहे. आगमी दोन दिवसांत मॉन्सून गोवा, दक्षिण कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 15 जूनपर्यंत गुजरात, मध्य प्रदेश अशी वाटचाल तो करणार आहे. तसेच जूनअखोरीस मॉन्सून संपूर्ण देशभरात पसरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.