मुंबईसह महाराष्ट्र गारठणार; हुडहुडी जाणवायला सुरुवात, तापमानात आणखी घट होणार

यंदा पावसाने नोव्हेंबरपर्यंत मुक्काम लांबवला होता. आता मुंबईत थंडीला सुरुवात झाली असून हुडहुडी जाणवायला लागली आहे. सध्या मुंबईकर सुखद गारवा अनुभवत आहेत. मुबईकरांनी गेल्या १३ वर्षांतील नोव्हेंबरमधील सर्वात थंड सकाळ अनुभवली. सांताक्रूझ वेधशाळेत किमान तापमान 15.7 सेल्सियस नोंदवले गेले. एकाच दिवसात 6.1 अशांची ची मोठी घसरण शनिवारी (२१.८°C ) झाली. याआधी नोव्हेंबर 2012 किमान तापमान 14.6 अंश इतके नोंदवले गेले होते.

मुंबईच्या तापमानात घट झाली असून हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात रविवारी 15.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. शनिवारी सांताक्रूझ येथे 21.8 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले होते. म्हणजेच अवघ्या 24 तासांत किमान तापमानात 6 अंशांनी घट झाली. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांनी नोव्हेंबर महिन्यात मुंबईत 16 अंशाखाली किमान तापमानाची नोंद झाली आहे. गेले काही दिवस मुंबईतील गारठा कमी झाला होता. मागील काही दिवस मुंबईचे किमान तापमान 20 ते 23 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदले जात होते. तसेच दिवसाचे तापमानही सरासरीपेक्षा अधिक होते. त्यामुळे दिवसभर उकाडा सहन करावा लागत होता. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी 20.5 अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात 15.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती.

मुंबईसह महाराष्ट्रतही आता थंडीचा कडाका जाणवत आहे. राज्यात सर्वत्र तापमान 15 अंशाच्या खाली गेले आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचे प्रमाण आणखी वाढणार असल्याने येत्या काही दिवसात मुंबईसह महाराष्ट्रात तापमानात घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता महाराष्ट्र लवकरच गारठणार असून हुडुहडी आणखी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबईकर गारवा अनुभवत आहे. त्याचप्रमाणे शहरातील हवेची गुणवत्ताही सुधारली आहे . मुंबईचा AQI 109 असून हा AQI गेल्या अनेक महिन्यांपापेक्षा खूप सुधारला आहे. गेल्या काही दिवसांत प्रदूषणामुळे मुंबईतील हवा खराब झाली होती. मात्र आता हवेची गुणवत्ता सुधारली असून AQIही 109वर आला आहे.