राज्यात आता पावसाने चांगलाच जोर धरला आहे. हवामान खात्याने ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्याप्रमाणे ऑगस्ट महिन्याची सुरुवात होताच पावसानेही दमदार बॅटिंग सुरू केली आहे. राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई आणि उपनगरात शनिवार दुपारपर्यंत पावासाचा चांगलाच जोर होता. त्यानंतर रात्रीही पावसाने हजेरी लावली. मात्र, रविवारी पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पुण्यात पावसाने दैना उडली असून शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. आता आठवडाभर राज्यात पावसाचा जोर राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
पुण्यासह, सातारा, नाशिक व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असल्याने प्रशासन हायअलर्टवर आहे. मराठवाड्यात लातूर वगळता इतर सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील पाच दिवस मराठवाड्यात पुन्हा हलक्या पावसाची शक्यता आहे.
4 Aug: IMD ने महाराष्ट्रात पुढील ४,५ दिवस मुसळधार ते अतीमुसळधार+ पावसाचा इशारा दिला आहे.
अधिक तपशीलांसाठी कृपया भेट द्या.https://t.co/5CS4HYuOJYhttps://t.co/8BKq9ajLOn pic.twitter.com/Uix0OKSQ3N— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 4, 2024
पुण्यात मुळा, मुठा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच नाशिकमध्येही अतिवृष्टी होत असून त्र्यंबकेश्वरमध्येही जोरदार पाऊस होत आहे. कोल्हापूर, साताऱ्यातही पावसाची संततधार सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. या तीन जिल्ह्यात प्रशासन हायअलर्टवर आहे.
राज्यात पुढील पाच दिवस हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे, सातारा, नाशिक, मुंबई आणि उपनगरे, पालघर, रायगड या जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाच्या सरींचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातही पुढील पाच दिवस हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरण आणि बंधाऱ्यांमधून सकाळपासून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी येत आहे. सध्या मराठवाड्यातील एकूण धरणसाठा हा 19.91 टक्क्यांवर आहे. नाशिकच्या पाच धरणांमधून सध्या विसर्ग सुरू असल्याने जायकवाडीतील धरण साठ्यात आता वाढ होणार आहे. पुणे शहर परिसरात सुरू असलेल्या पावसाचा जोर कमी होत असला तरी धरणातील पाणीसाठा वाढल्याने विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळे नदी पात्राच्या परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे.