पुणे शहर व परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचारांच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. एकीकडे महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात प्रत्येक गावात महिलांवर अत्याचार सुरू असताना राज्य सरकार मात्र स्वतःची जाहिरातबाजी करण्यात मग्न आहे. त्यामुळे या सरकारला शुद्धीवर आणण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे अलका चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी भर आंदोलनात ‘सामना’ झळकावत पोलिसांवरील हल्ल्यांवरून सरकारचा कडक शब्दात समाचार घेतला.
यावेळी ‘गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या.., मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा द्या.., उपमुख्यमंत्री अजित पवार राजीनामा द्या.., महिला अत्याचाराने त्रस्त सरकार राजकारणात व्यस्त,’ अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण डेक्कन परिसर दणाणून सोडला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार रमेश बागवे, मोहन जोशी, रवींद्र माळवदकर, अविनाश साळवे, महिला शहर संघटिका संगीता ठोसर, मृणालिनी वाणी, अमृता पठारे, सुलभा तळेकर, करुणा घाडगे, विजया मोहिते, स्नेहल पाटोळे, शीतल जाधव, शहर संघटक राजेंद्र शिंदे, उपशहरप्रमुख बाळासाहेब मालुसरे, रूपेश पवार, दिलीप पोमण, अमोल पवार, अजय परदेशी, संजय लोहोट, राहुल शेडगे, नागेश खडके, आशिष आढळ, शिरीष कोल्हटकर, शंतनू मोकाशी, परवेश राव, गनी पटेल, संजय खांडेकर, संगीता तिवारी यावेळी उपस्थित होते.
बोपदेव घाटात घडलेल्या घटनेतील पीडित मुलीला न्याय मिळत नाही, तो पर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.