मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी भ्रष्टाचारी महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून रविवारी हुतात्मा चौकापासून गेट वे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकरली होती. मात्र, हा मोर्चा सुरू होण्याआधी या मोर्चाला परवानगी देण्यात आली. मोर्चा निघाल्यावर पोलिसांनी मोर्चा अडवला नाही. हा मोर्चा गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत गेला. येथे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प वाहून अभिवादन करत या मोर्चाची सांगता झाला. यावेळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी सरकारविरोधात आपला रोष व्यक्त केला.
मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यातच कोसळला. यात भ्रष्टाचार झाल्यामुळेच हा पुतळा कोसळला. महाराष्ट्रातील जनता छत्रपती शिवरायांचा अवमान कदापीही सहन करणार नाही. या प्रकरणातील दोषींना अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात आली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडो मारण्यात आले आणि या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.
राज्यात सध्या जे वातावरण आहे, त्याला राजकारण म्हणता येणार नाही. शिवद्रोही लोकं आपल्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. आपण राजकारण करत आहोत असे ते म्हणतात. मात्र, ते करत आहेत ते राजकारण नसून गजकर्ण आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाच्या चुकीला माफी नाही. आपल्या मनातील संताप व्यक्त करण्यासाठी आपण हे ठिकाण निवडले आहे. शिवद्रोही सरकार बेकायदा बसलेले आहे. त्यांना गेट ऑऊट ऑफ इंडिया म्हणण्याची वेळ आली आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
पंतप्रधान मोदी यांनी माफी मागितली. त्यांनी माफी मागितली नसती तर राज्याने त्यांना शिल्लक ठेवले असते का, माफी मागतानाही त्यांच्या चेहऱ्यावरची मग्रुरी आपल्याला मान्य नाही. मग्रुरीने मागितलेली माफी आम्हांला मान्य नाही. मोदी माफी मागत असताना व्यासपीठावरील एक हाफ हसत होते. महाराजांची एवढी थट्टा ते करतात. मोदी यांनी नेमकी कशासाठी माफी मागितली, असा सवालही त्यांनी केला. महाराजांचा पुतळा कोसळला म्हणून माफी मागितली, कामात भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली की भ्रष्टाचाऱ्यांवर पांघरूण घालण्यासाठी त्यांनी माफी मागितली, त्यांनी नेमकी कशासाठी माफी मागितली , असा सवाल त्यांनी केला.
मोदी गॅरंटी म्हणतात, ती हीच हात लावीन तिथे सत्यानाश. ते कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी माफी मागणार आहेत. संसद भवन गळत आहे. राम मंदिराला गळती लागली आहे. मोदीजी यांनी माफई मागण्यापेक्षआ अस बस, त्यांनी आता थांबावे. जनतेकडून चूक घडली असेल. त्यांना निवडून दिले. हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे. महाराजांची माफी मग्रुरीने मागून चालणार नाही. हा महाराष्ट्राचा आत्माचा, धर्माचा अपमान आहे. महाराष्ट्र शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना कधीही माफ करत नाही करणार नाही, हे दाखवण्यासाठी आपण येथे जमलो आहोत. आता महाराष्ट्रद्रोही, शिवद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय शांत बसू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. मालवण येथील पुतळा वादळी वाऱ्यामुळे कोसळला असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले. मात्र, गेट वे ऑफ येथे तसेच राज्याच्या अनेक किनारीभागात शिवाजी महाराज यांचे पुतळे आहेत. वादळी वारे सोसत हे पुतळे आजही उभे आहेत. मात्र, राजकोट येथील पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्यानेच पुतळा कोसळला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. त्यासाठी सरकारचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
राजकोट किल्ल्यावर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाच नाही, तर महाराष्ट्राचा अवमान या सरकारने केला. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. त्यांचा अपमान या सरकारने केला आहे. या सरकारचा निषेध करण्यासाठी आपण मोठ्या संख्येने येथे जमलो आहोत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. शरद पवार आणि छत्रपती शाहू महाराज हे दोघेही प्रकृती अस्वास्थ असूनही सरकारचा निषेध करण्यासाठी येथे आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली तरीही आंदोलन करण्यात येत आहे, यात राजकारण असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, शिवद्रोह्यांचा निषेध करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने जनता एकत्र आली आहे. आता राज्यात यापुढे शिवद्रोही सरकार पुन्हा येऊ देणार नाही, असा निर्धार आपण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री निवडणुकीच्या तोंडावर माफी मागत आहे. या माफीवीरांना आता घरचा रस्ता दाखवायचा आहे. या सरकारला चले जाव असे बजावण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
शिवाजी महाराजांचा पुतळा अशाप्रकारे कोसळणे, हा राज्याचा अपमान आहे. या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. असा पुतळा ज्यांनी बसवला आणि ज्यांनी अशा पुतळ्यात भ्रष्टाचार करत ज्यांनी उद्घाटन केले, त्यांचा निषेध करण्यासाठी आपण जमलो आहोत, असे छत्रपती शाहू यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राच सन्मान आपण जपण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.