विधानसभा निवडणूक एकत्र लढणार! संयुक्त पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीची घोषणा

उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपचा अजिंक्यपणा किती फोल आहे हे जनतेने दाखवून दिले आहे. लोकसभा निवडणूक ही अंतिम लढाई नाही! लढाई आता सुरू झाली आहे. विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच इतर घटक पक्ष आणि सामाजिक संघटनांना सोबत घेऊन ताकदीने लढणार!

भाजपविरोधात कोणीच लढू शकत नाही, ते अजिंक्य आहेत असे वातावरण निर्माण केले असताना महाराष्ट्रात महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळवले. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी जनतेने देशात आणि महाराष्ट्रात इंडिया आघाडीला कौल देऊन भाजपच्या अजिंक्यपदाचा दावा फोल ठरवला. मात्र हा विजय अंतिम नाही. खरी लढाई आता सुरू झाली आहे. देशाला आता जाग आली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष घटकपक्षांसह एकत्र लढणार असल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 48 पैकी 30 जागांवर विजय मिळाला. या यशामुळे महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मिंधे सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. मोदी सरकार आता ‘एनडीए’ सरकार झाले आहे. हे सरकार किती दिवस चालेल, हा खरा प्रश्न आहे. आमच्याबद्दल आघाडी नैसर्गिक की अनैसर्गिक अशी टीका केली जात होती; मात्र दिल्लीत आता जे काही कडबोळे झाले आहे ते नैसर्गिक आहे की अनैसर्गिक हाच एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकूण लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देशातील जनता आता जागी झाली. हे आपले फार मोठे यश असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे आणि भक्कमपणे लढणार आहे. लोकसभेपेक्षा विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला अधिक मते मिळून महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन निश्चितपणे होईल, असा जबरदस्त आत्मविश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, विद्या चव्हाण आदी उपस्थित होते.

भाजपचे ‘नॅरेटिव्ह’ खरे होते का?
इंडिया आघाडीला मते दिली तर तुमची संपत्ती जास्ती मुले होणाऱयांना वाटतील हे कोणते नॅरेटिव्ह होते? मंगळसूत्र उचलून नेतील, तुमच्या घरातील नळ कापून नेतील, वीज कापून नेतील, तुमची म्हैस चोरून नेतील, नकली संतान, नकली शिवसेना हे काय खरे नॅरेटिव्ह होते? मी प्रत्येकाला नोकरी, घर देईन, उद्योगधंदे वाढवीन हे काय खरे नॅरेटिव्ह होते, असा सवालही त्यांनी केला. अच्छे दिन आयेंगे, प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करणार हे नॅरेटिव्ह तर आपण विसरूनच गेलो आहोत. मोदी गॅरेंटीचे काय झाले, असा सणसणीत सवालही त्यांनी केला

भाजपला गुजरातमध्येच सुरुंग लागेल
भाजपला त्यांच्या अट्टहासाबद्दल दहा वर्षांत समजायला पाहिजे होते की, देशाने मोदींना पंतप्रधान पद दिले होते. आता कसेबसे त्यांचे पंतप्रधान पद वाचले आहे. किती दिवस हे सरकार राहील हे माहीत नाही, पण गुजरात या त्यांच्या मूळ राज्यातच त्यांना सुरुंग लागेल, असा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला. कारण मोदी व भाजपवरचा लोकांचा विश्वास उडाला आहे. येत्या निवडणुकीत चित्र फार बदललेले व देशाच्या दृष्टीने सुधारलेले दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सोबत येणाऱ्यांना घेऊन पुढे जाणार
विधानसभा निवडणुकीत आमच्यासोबत लोकसभा निवडणुकीत राहिले व संघर्ष केला त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. काही लोक येणार असतील तर खेचाखेची न करता येण्यास तयार असतील तर विचार करू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

समाजमाध्यमांचे आभार
निर्भय बनो यू टय़ूबच्या माध्यमातून निखिल वागळे, हेमंत देसाई, प्रशांत कदम, अशोक वानखडे, रवीशकुमार हे सर्वच एका धाडसाने जनतेचे प्रश्न हिंमतीने मांडत आले आहेत. त्यांनी निःपक्षपातीपणे एक बाजू मांडली. त्यांच्या मांडण्यामुळेच जनतेला सत्य काय आहे हे कळत गेले. ही लढाई फार विचित्र होती. आर्थिकदृष्टय़ा, यंत्रणेच्या दृष्टीने विषम लढाई होती.

भाजपच्या विरोधात कोटय़वधी मते
महाविकास आघाडीपेक्षा फक्त 0.03 टक्के मते आपल्याला कमी मिळाली असा दावा भाजपचे नेते करीत आहेत. मात्र देशाची लोकसंख्या 140 कोटींपेक्षा अधिक आहे. यातील मतदानाचा हक्क किती जणांना आहे याचा आकडा पाहिल्यास भाजपला किती मते मिळाली याचाही आकडा मिळेल. यापैकी भाजपला किती मते मिळाली आणि उरलेल्या कोटय़वधींनी भाजपविरोधात मतदान केले हेदेखील समजेल, असे ते म्हणाले.

सरकारची अवस्था ‘वसेचिना’सारखी
मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ महाराजांच्या भारुडाचा आधार घेत ‘काटय़ाच्या अणीवर वसली तीन गावे, दोन ओसाड एक वसेचिना’ अशी टीका केली होती. पण आता त्यांची हालत तशीच आहे. तिन्हीच्या तीनही तशीच आहेत. त्यांची अवस्था खऱया अर्थाने वसेचिना अशी आहे. एकही वसत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

लोकशाही वाचवण्यासाठी सर्वधर्मीयांचे मतदान
शिवसेनेला मराठी मतदारांची मते मिळाली नाहीत आणि ‘एम’ फॅक्टरमुळे महाविकास आघाडीचा विजय झाला असा प्रचार भाजपकडून सुरू असल्याबद्दलही त्यांनी परखडपणे मत मांडले. आम्हाला मराठी मते का कमी मिळतील? ‘एम’ फॅक्टरमध्ये मराठी येत नाही का? यावेळी आम्हाला लोकशाही वाचवण्यासाठी सर्वधर्मीयांनी मतदान केले. त्यामध्ये मराठी तर आहेतच. शिवाय हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि इतर सर्वच आहेत.

मोदी मिठाला जागणार का?
निवडणुकीतील अपयशानंतर भाजपने व्होट जिहादचा मुद्दा पुढे रेटण्यास सुरुवात केली आहे. याचा उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, ‘व्होट जिहाद’ ही संकल्पनाच कळलेली नाही. कारण नरेंद्र मोदी यांनीच त्यांच्या भाषणातच सांगितले होते की, त्यांचे बालपण मुस्लिम कुटुंबीयांच्या सान्निध्यात गेले आहे. ईदच्या मिरवणुकीत ते ताजियाखालून जायचे, त्यांच्या घरचे जेवण ते जेवायचे. मग आता त्या खाल्ल्या मिठाला ते जागणार आहेत की नाही ते मोदींनीच सांगावे, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.

महाराष्ट्राला हक्काचे मिळालेच पाहिजे
आमचा गुजरातबद्दल काही राग नाही. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर गुजरातच्या हक्काचे जे काही द्यायचे ते देऊ; पण मोदी आणि अमित शहा गुजरात व संपूर्ण देश यामध्ये एक भिंत उभी करीत आहेत. हे घातक आहे. महाराष्ट्राच्या हिताचे असेल ते महाराष्ट्राला मिळालेच पाहिजे. अन्य राज्यांना जे काही आवश्यक आहे, हक्काचे आहे ते दिले पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

गद्दारांना परतीचे दरवाजे बंद
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या यशानंतर शिंदे गटात गेलेले अनेकजण शिवसेनेत परत येण्यास इच्छुक आहेत. या प्रश्नावर उत्तर देताना एका क्षणाचाही विलंब न लावता ‘अजिबात परत घेणार नाही’ असे त्यांनी ठामपणे सांगितले. हाच प्रश्न अजित पवार यांच्याबाबत शरद पवार यांना विचारला असता ‘सोडून गेलेल्यांना परत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’, असे शरद पवार म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल
निवडणूक चिन्हाच्या संदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाला आम्ही सर्वेच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मुळात निवडणूक आयोगाचा निकाल कसा अयोग्य होता त्याबद्दल सर्वेच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली आहेच. या याचिकेचा निकाल एका महिनाभरात लागेल. जनतेच्या न्यायालयात काय झाले हे लोकसभा निवडणुकीत सर्वांनी पाहिले आहे याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले. सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात अमोल कीर्तिकर यांच्या पराजयाच्या विरोधातही आम्ही कोर्टात जाणार आहोत. कोर्टात भाजपचा फोलपणा सिद्ध होईल.

राम भाजपमुक्त झाला
राममंदिर उभारण्याचे श्रेय घेणाऱया भाजपला अयोध्येतच पराभव पत्करावा लागला. आम्ही 22 जानेवारीला काळाराम मंदिरात गेलो. 23 जानेवारीला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी नाशिकच्या सभेत मी म्हटले होते की, राम भाजपमुक्त झाला पाहिजे. तो राम अयोध्यावासीयांनी भाजपमुक्त केला. ज्या ठिकाणी प्रभूरामचंद्रांचे वास्तव्य होते तिथे भाजपने सपाटून मार खाल्ला आहे. त्यामुळे राम भाजपमुक्त झाला!

उद्धव ठाकरे खणखणीत
इंडिया आघाडीला मतं दिली तर ते तुमची संपत्ती जास्त मुलं होणाऱयांना वाटतील, मंगळसूत्रं उचलून नेतील, तुमच्या घरातील नळ कापून नेतील, वीज कापतील हे भाजपचं नरेटिव्ह खरं होतं काय?

नकली सेना, नकली संतान, प्रत्येकाला नोकरी देईन, प्रत्येकाला घर देईन, उद्योगधंदे येतील हे नरेटिव्ह खरं होतं काय?

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा त्या सरकारला देवेंद्र फडणवीस तीन चाकी रिक्षा म्हणाले होते. आज केंद्रातील भाजपची स्थिती काय आहे? त्यांचीही अवस्था तीन चाकी सरकारसारखीच आहे.

गद्दारांना दरवाजे बंद. शिवसेनेत पुन्हा घेणार नाही!

मुंबई आणि महाराष्ट्र लुटणाऱयाला मराठी माणूस कदापि मत देणार नाही!

देशप्रेमी बांधवांनी आम्हाला कौल दिला आहे. ही जाग आता आपल्या देशाला आली आहे.

पूर्वी देशात मोदी सरकार होते. आता केंद्रात एनडीएचे सरकार आहे. हे सरकार किती काळ चालेल याविषयी शंकाच आहे.

देशातील राजकारणात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची – जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पत्रकार परिषदेमागील उद्देश स्पष्ट करताना म्हणाले की, महाविकास आघाडीने महाराष्ट्रात घवघवीत यश मिळवले. निवडणुकीनंतर महाविकास आघाडी प्रसिद्धी माध्यमांसमोर येत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, आप, राज्यातील विविध संघटनांनी प्रचारात प्रचंड मोठी कामगिरी केली. जनजागरण केले. डॉ. विश्वंभर चौधरींची ‘निर्भय बनो’ संघटना, निखिल वागळे, अॅड. असिम सरोदे, वेगवेगळय़ा सामाजिक संघटनांनी राज्यात जनजागरण करून महाराष्ट्रात विजय प्राप्त केला. देशातल्या राजकारणात महाराष्ट्राने बजावलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

– मराठी माणसाने रक्त सांडून मिळवलेली मुंबई त्यांच्या डोळय़ांदेखत लुटली जात असेल तेव्हा मराठी माणूस ती लुटणाऱयांना मत देईल का, असा सवालही त्यांनी केला. महाराष्ट्र आणि मुंबई लुटणाऱयांना मराठी माणूस झोपेतसुद्धा मत देणार नाही. त्यामुळे भाजपला अजूनही जर वास्तवाची जाणीव झाली नसेल तर त्यांना निवडणुकीच्या निकालाच्या विस्तवाला सामोरे जावे लागेल!

पंतप्रधानांच्या महाराष्ट्रभेटींनी आम्हाला बहुमत मिळेल – शरद पवार
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यश मिळाल्याचा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. लोकसभेसाठी मोदींच्या महाराष्ट्रात 18 सभा आणि रोड शो झाले. मात्र ज्या ज्या ठिकाणी मोदींच्या सभा, रोड शो झाले त्या बहुतांशी ठिकाणी भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला. त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जनतेने फार मोठय़ा प्रमाणात पाठिंबा दिला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात जेवढय़ा जास्त ठिकाणी भेटीला येतील तेवढे आम्हाला स्पष्ट बहुमत मिळण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होईल. त्यामुळे त्यांनाही धन्यवाद देणे हे माझे कर्तव्य समजतो, असा टोलाही त्यांनी लगावला. पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेण्याचा प्रश्नच नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभेत मोठा भाऊ, छोटा भाऊ असे चालणार नाही – पृथ्वीराज चव्हाण
लोकसभेपेक्षाही अधिक आशीर्वाद आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत मिळतील आणि महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन निश्चितपणे होईल. या निवडणुकीत मोठा भाऊ व छोटा भाऊ असे चालणार नाही. आम्ही मागील निवडणुकांचा आधार घेऊन प्रत्येक मतदारसंघात सर्वात चांगला उमेदवार देऊन जागावाटपाचा प्रश्न सर्वानुमते सोडवू, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. लोकशाही वाचवण्यासाठी देशात जे मतदान झाले त्यात महाराष्ट्रातील जनतेचा फार मोठा वाटा आहे. राज्यातील जनतेसह शेतकऱयांनीही सरकारला संदेश पाठवला आहे कोणत्याही समाजाला गृहित धरू नका. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या आचरणावरून आदर्श घेऊन सर्वधर्मसमभावाची भूमिका आम्ही राबवतो. त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा चालला नाही, असेही ते म्हणाले.