
राज्यातील वीज ग्राहकांना दरवाढीचा मोठा शॉक बसणार आहे. महावितरण कंपनीने राज्य वीज नियामक आयोगाकडे 20 ते 40 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. ही वीज दरवाढ अदानींच्या फायद्यासाठी केली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवत्ते अतुल लोंढे यांनी आज केला.
शेजारच्या गुजरात, कर्नाटक, तेलंगणा राज्यांत महाराष्ट्रापेक्षा विजेचे दर कमी आहेत. गुजरामध्ये घरगुती वीज दर 3 ते 5.2 रुपये प्रतियुनिट, कर्नाटकात 3.7 ते 7.3 रुपये प्रतियुनिट, तेलंगणात 2 ते 10 रुपये प्रतियुनिट दर असताना महाराष्ट्रात तेच दर 4.4 ते 12.8 रुपये प्रतियुनिट आहेत. वीज निर्मितीसाठी लागणारा खर्च सर्व राज्यांत सारखा असताना महाराष्ट्रातच वीज महाग का, असा सवाल लोंढे यांनी या वेळी केला.
राज्यातील वीज ग्राहकांना स्वस्तात वीज मिळेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. पाच वर्षांत विजेचे दर 50 टक्क्यांनी कमी केले जातील असे सांगितले होते. मात्र आता वीज 16 टक्क्यांनी महाग होणार आहे याबाबत फडणवीस यांनी खुलासा करावा -अतुल लोंढे, काँग्रेसचे प्रवत्ते
































































