‘खिशात नाही आणा अन् मला बाजीराव म्हणा!’ अशी गत राज्यातील मिंधे सरकारची आहे. आपल्याला काय, घोषणा करायच्या आणि निघून जायचे हेच या सरकारचे धोरण. नांदेड, लातूरकरांना थाप मारणाऱ्या मिंधे सरकारने अमृतमहोत्सवाच्या नावाखाली बीडकरांनाही ‘मामा’ बनवले मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने गेल्या वर्षी बीडकरांवर तब्बल 1143 कोटी रुपयांच्या निधीची बरसात करण्यात आली. परंतु ही बरसात कोरडीच होती. यापैकी एक रुपयाही अद्याप मिळालेला नाही. प्रशासनाला यासंदर्भात काहीही बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. अमृतमहोत्सवी निधीचे काय झाले, असे विचारले तरी अधिकारी कोमात जात असल्याचे चित्र आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या वर्षी मिंधे सरकारने विशेष बैठक घेतली होती. या बैठकीत 46 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची वाजतगाजत घोषणा करण्यात आली होती. बीड जिल्हयासाठी विविध खात्याअंतर्गत 1143 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. ट्रॉमा सेंटर, ग्रामीण रुग्णालय, साठवण तलाव, कोल्हापुरी बंधारे, आयुर्वेदिक पार्क, पोलीस हाऊसिंग सोसायटी, सीताफळ संशोधन केंद्र, औद्योगिक वसाहत… मिंधे सरकारने नुसतेच कागदी घोडे नाचवले. वर्षभरात यापैकी एकही विकास योजना प्रत्यक्षात आली नाही. त्यासाठी मंजूर केलेल्या निधीचा एक रुपयाही आलेला नाही.
घोषणांची पूर्तता झाली नाही
मराठवाडा मुक्तीसंग्राम महोत्सव वर्षानिमित्त मोठा गाजावाजा करून संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक घेऊन घोषणांचा पाऊस पाडला होता. यात झालेल्या घोषणांची बऱ्याच अंशी अद्यापही पूर्तता झालेली नाही. तत्पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांचाच उल्लेख आणि श्रेय घेण्याचा प्रयत्न त्या बैठकीत झाला. महाविकास आघाडीच्या सरकारने मंजूर केलेली कामे सध्या सुरू आहेत, असे आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले.
लबाडांकडून काय अपेक्षा करणार?
राज्यातील सरकार लबाडीच्या पायावर उभे आहे. या लबाडांकडून काय अपेक्षा करणार? एक लबाडी झाकण्यासाठी अनेक लबाड्या कराव्या लागतात, अशी सध्या स्थिती या सरकारची आहे. थापा मारणे, बोलता बोलता फसवाफसवी करणारे हे सरकार आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया भाई गंगाभीषण थावरे यांनी दिली आहे.
बीडकरांना मारलेल्या थापा
आष्टी येथे कृषीपूरक एमआयडीसीसाठी 38 कोटी ॥ वडवणी तालुक्यात पुसरा एमआयडीसी पाटोदा येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परळी औष्णिक केंद्रासाठी निधी। बीड, परळी, अंबाजोगाईत पोलीस हाऊसिंग सोसायटीसाठी 300 कोटी माजलगाव शहरातील रस्त्यांसाठी 46 कोटी। सीताफळ आणि इतर फळांच्या उद्योगासाठी 5 कोटी अंबाजोगाई शासकीय कृषी महाविद्यालयातील मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी 105 कोटी माजलगाव ट्रामा सेंटर आणि धारूर तालुक्यातील तेलगाव, वडवणी ग्रामीण रुग्णालयासाठी 374 कोटी पाटोदा तालुक्यात रोहतवाडी आणि उंबरविहिरी साठवण तलाव ॥ आष्टी आणि शिरूर तालुक्यात कोल्हापुरी बंधारे। परळी येथे आयुर्वेदिक पार्क