घाबरु नका! नवे तारे चमकतील, विराट-रोहितच्या निवृत्तीनंतर संजय मांजरेकरांचा क्रिकेटप्रेमींना सल्ला

विराट कोहली आणि रोहित शर्मा कसोटीतून निवृत्त झालेत म्हणून घाबरण्याची गरज नाही. गेल्या दशकांत फॅब फोरने (सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरभ गांगुली आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण) निवृत्ती घेतल्यानंतरही हिंदुस्थानी क्रिकेटने दमदार पुनरामगन केले होते. आताही नवे तारे चमकतील आणि हिंदुस्थानी क्रिकेटचे नभांगण उजळून टाकतील, असा विश्वास माजी कसोटीपटू संजय मांजरेकर यांनी व्यक्त करत हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींना धीर देण्याचा प्रयत्न केला.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये भयाण शांतता पसरल्याची भावना निर्माण झाली आहे. विराटची निवृत्ती तर असंख्य क्रिकेटप्रेमींना पटतही नाहीय. अजूनही तीन-चार वर्षे सहज कसोटी क्रिकेट खेळणारा आपला आवडता खेळाडू निवृत्त झाल्याची बातमी क्रिकेटप्रेमींच्या पचनीच पडली नाहीय. याबाबत संजय मांजरेकर यांनी क्रिकेटप्रेमींना दिलासा देताना सोशल मीडियावर विराट-रोहितच्या निवृत्तीची फॅब पह्रच्या निवृत्तीची तुलना केली. सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडीओत म्हणाले, मला कल्पना आहे की हिंदुस्थानी चाहते चिंतीत आहेत. फॅब पह्रच्या निवृत्तीनंतरही सर्वांनी अशीच काळजी वाटत होती, परंतु काही वर्षांनंतर हिंदुस्थानी संघ क्रिकेट जगतातील नंबर वन संघ बनला. जोपर्यंत हिंदुस्थानात क्रिकेट लोकप्रिय आहे आणि असंख्य गुणवंत, प्रतिभावंत युवा खेळाडू हिंदुस्थानसाठी खेळण्यास उत्सुक आहेत तोपर्यंत काहीही होणार नाही. मात्र हिंदुस्थानी संघासाठी पुढचा प्रवास नक्कीच खडतर असेल आणि हिंदुस्थानी संघापर्यंत पोहोचणारे नक्कीच प्रतिभाशाली खेळाडू असतील, असेही मांजरेकर म्हणाले.

रोहित-विराट निवृत्तीनंतर हिंदुस्थानी संघाला आपल्या विजयी ट्रॅकवर येण्यासाठी नक्कीच काही काळ लागेल. पण तुम्ही घाबरू नका. फॅब फोर गेल्यानंतर काय झाले होते? आपली गोलंदाजी अधिक बळकट झाली. आताही असेच होऊ शकते. हिंदुस्थानी नभांगणात नव्या ताऱयांचा उदय होईल. नवे गोलंदाज तळपतील. हिंदुस्थान क्रिकेटविश्वात आघाडीवर कायम राहील. सध्याच्या हिंदुस्थानी संघाला तुम्ही या दृष्टिकोनातूनही पाहू शकता, ज्यात विराट आणि रोहितसुद्धा होते आणि आपण आपल्या मायभूमीतच न्यूझीलंडविरुद्ध 3-0 ने हरलो होतो आणि नंतर आपण ऑस्ट्रेलियाविरुद्धही दारुणरीत्या हरलो. आताच्या संघाकडे आता हरण्यासाठी काहीही उरलेले नाही. त्यामुळे नव्या हिंदुस्थानी संघाला संजय मांजरेकरांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

फॅब फोरनंतर नेमकं काय घडलं…

हिंदुस्थानी संघाचे फॅब फोरमधून सौरभ गांगुली सर्वात आधी निवृत्त झाला आणि या यादीत वीरेंद्र सेहवागची एण्ट्री झाली. 2011 साली हिंदुस्थानी संघाने वन डे क्रिकेटचे जगज्जेतेपद जिंकल्यानंतर संघातील दिग्गजांना निवृत्ती घेण्यास भाग पाडले जाऊ लागले. ज्यात 2012 मध्ये राहुल द्रविड आणि लक्ष्मणला निवृत्त व्हावे लागले. मग 2013 मध्ये सेहवागलाही कसोटी क्रिकेटला रामराम करावे लागले होते आणि सर्वात शेवटी क्रिकेटचा देव असलेल्या सचिनला सन्मानाने निवृत्ती देण्यात आली. हे सारे निवृत्त झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रवींद्र जाडेजा, अजिंक्य रहाणेसारख्या खेळाडूंना कसोटी क्रिकेटमध्ये संधी लाभली. आताही तसेच मोठय़ा क्रिकेटपटूंचा उदय होईल, असे भाकीत वर्तवले जात आहेत.