सरकारी नोकऱ्यांमध्ये खेळाडूंचा राखीव कोटा पुन्हा सुरू करा, महेश सावंत यांची सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चांगल्या जीवनमानासाठी चांगले शिक्षण, आरोग्य आणि रोजगार महत्त्वाचा असून त्यावर सरकारने अधिकाधिक भर द्यावा, अशी सूचना शिवसेना आमदार महेश सावंत यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेवर बोलताना मांडली. सरकारी नोकऱ्यांमध्ये खेळाडूंना असलेला राखीव कोटा पुन्हा सुरू करा, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरवल्या पाहिजेत, असे सांगत महेश सावंत यांनी मुंबईतील रुग्णालयांच्या दुरवस्थेकडेही लक्ष वेधले. केईएम रुग्णालयात एका खाटेवर दोन-दोन रुग्णांवर उपचार करावा लागत आहे. कामगार आणि पोद्दार रुग्णालयात उपचारांच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. धर्मादाय रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी गरीब रुग्णांना बराच त्रास सहन करावा लागतो, लोकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या सोयीसुविधांसाठी सरकारने अधिक आर्थिक निधी दिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

समुद्रकिनारी वॉपिंग आणि सायकलिंग ट्रक बनवा

प्रभादेवी आणि माहीमपर्यंतच्या समुद्रकिनारी वॉकिंग किंवा सायकलिंग ट्रक बनवा, माहीम व प्रभादेवी भागात म्हाडाकडून पुनर्विकास सुरू असलेल्या इमारतींमधील रहिवाशांना मासिक भाडे मिळत नाही, एसआरएमधून झालेल्या इमारतींमधील रहिवाशांना मेंटेनन्स मिळत नाही, याकडेही शासनाने लक्ष द्यावे. झोपडपट्टीतील दुकानांवर असेसमेंट टॅक्स कमर्शियलप्रमाणे लावला जातोय, त्यातून त्यांना सवलत मिळावी असे सावंत म्हणाले. उद्यानांमध्ये सुरक्षा कॅमेरे, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांच्या व्यवस्थेचा मुद्दाही त्यांनी प्रभावीपणे मांडला.