अटी शिथिल, मुदत वाढवूनही माहुलच्या घरांना अल्प प्रतिसाद; दीड महिन्यात केवळ 231 कर्मचाऱ्यांचे अर्ज

मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी स्वस्तात उपलब्ध करून दिलेल्या माहुलच्या घरांसाठी अटी शिथिल करून तीनदा मुदतवाढ देऊनही घरांना अल्प प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या दीड महिन्यात 231 कर्मचाऱ्यांनी घरांसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे माहुलमधील 9 हजार 98 घरांच्या विक्रीचे मोठे आव्हान आता पालिकेसमोर उभे राहिले आहे.

माहुलमधील सदनिकांमध्ये प्रकल्पबाधित राहायला जात नसल्याने तब्बल 13 हजार घरे रिकामी आहेत. त्यापैकी 9 हजार 98 घरे ही पालिका कर्मचाऱ्यांना 12 लाख 60 हजार रुपये किमतीत मालकी तत्त्वावर विकण्यास पालिका तयार झाली असून त्यासाठी कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले होते. मात्र 15 मार्चपासून आतापर्यंत केवळ 231 कर्मचाऱ्यांनी पालिकेकडे अर्ज केले आहेत.

कर्मचारी वसाहतींमध्ये राहणारे करू शकतात अर्ज 

पालिकेकडून 15 मेपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. शिवाय काही अटीही शिथिल केल्या आहेत. यात क्लास वन अधिकारी सोडून सर्व अधिकारी घरांसाठी पात्र असतील तसेच कर्मचारी वसाहतींमधील कर्मचाऱ्यांनाही घरासाठी अर्ज करता येणार आहे, मात्र घर खरेदी केल्यावर कर्मचारी वसाहतीमधील घर सोडावे लागणार आहे. मात्र निकषामध्येही अनेक बदल करूनही पालिकेला कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद मिळालेला नाही.