बॉलीवूडचा अभिनेता सलमान खान यांच्या मुंबई येथील निवासस्थानी गोळीबार करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला हरियाणातून अटक करण्यात आली आहे. सुखा शूटर असे अटक केलेल्याचे नाव असून तो बिष्णोई गँगचा सदस्य असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पनवेल शहर पोलिसांनी केली असून रात्री उशिरा त्याला पनवेलमध्ये आणण्यात आले.
सलमान खानच्या हत्येचा कट रचणे तसेच त्याच्या राहत्या घरावर गोळीबार करून सलमानला ठार मारण्याचा प्रयत्न काही महिन्यांपूर्वी करण्यात आला. नुकतेच अजित पवार गटाचे माजी आमदार बाबा सिद्दिकी यांनाही ठार मारण्यात आले. या दोन्ही प्रकरणाची जबाबदारी बिष्णोई गँगने घेतली असल्याने मुंबई पोलिसांच्या समोर नवे आवाहन उभे राहिले आहे. दरम्यान सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण घडल्यानंतर मुंबई, नवी मुंबई, पनवेल पोलिसांनी कारवाई करत दोन संशयितांना याआधी अटक केली होती. हे दोन आरोपी काही दिवस पनवेल येथे वास्तव्याला असल्याचे समोर आले होते. या दोघांच्या अटकेनंतर पोलिसांनी आणखीन पाच संशयित आरोपींना अटक केली होती. मात्र या टोळीचा मुख्य, मोस्ट वॉण्टेड आरोपीचा शोध पोलीस घेत होते.
पनवेल येथील फार्महाऊसची रेकी
सुखा शूटर असे त्याचे नाव असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तो पोलिसांना चकवा देण्यात वारंवार यशस्वी होत होता. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना त्याच्याविषयी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर हरियाणा येथील पानिपत येथून त्याच्या मुसक्या आवळल्या. सहकाऱ्यांना पैसे, हत्यार पुरवणे त्याच्यावर जबाबदारी होती. सुखा याने स्वतः सलमान खानच्या पनवेल येथील फार्महाऊसची रेकी केली होती आणि सलमानला रस्त्यातच गाठून ठार करण्याचा प्रयत्न त्याचा होता, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
माझ्या कुटुंबाला न्याय हवाय! झिशान सिद्दिकी यांची पोस्ट
‘माझ्या वडिलांनी गरीब, निष्पाप लोकांचे जीवन आणि घरांचे संरक्षण, बचाव करताना आपला जीव गमावला. आज माझे कुटुंब तुटले आहे, परंतु त्यांच्या मृत्यूचे राजकारण केले जाऊ नये. त्यांचा मृत्यू नक्कीच व्यर्थ जाऊ नये. मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा,’ असे आमदार झिशान सिद्दिकी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.