
ज्येष्ठ रंगकर्मी आणि प्रख्यात नाटय़ व्यवस्थापक अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून साकारलेला ’माझा पुरस्कार’ सोहळा 24 मार्च रोजी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात मोठय़ा उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे यंदाचे 20 वे वर्ष होते. यावेळी मराठी चित्रपट आणि नाटय़सृष्टीतील अनेक नामवंतांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.
नाटय़ क्षेत्रातील कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला रसिक प्रेक्षकांचा आणि कलाकारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान मराठी आणि हिंदी गाण्यांची बहारदार मैफलही रंगली होती. जयंत पिंगुळकर, केतकी भावे-जोशी, श्रीरंग भावे आणि शिल्पा मालंडकर यांसारख्या प्रसिद्ध गायकांनी आपल्या गायनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सोहळ्यात ’गोष्ट तिच्या घटस्फोटाची’ या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता – संग्राम समेळ, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता -राजन ताम्हाणे, सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार – संदेश बेंद्रे, ’बोलविता धनी’ या नाटकासाठी लक्षवेधी अभिनेता – क्षितीश दाते, सर्वोत्कृष्ट वेशभूषा – मयूरा रानडे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – शिवानी रांगोळे ’शंकर जयकिशन’, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – ऋषिकेश जोशी यांना ’माझा पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनयसंपन्न दांपत्य म्हणून अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.


























































