
बहुचर्चित भोंदूगिरी आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरात याच्या संदर्भात बुधवारी 1 एप्रिल रोजी नाशिक सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. अशोक खरातची पोलीस कोठडी संपल्यामुळे बुधवारी त्याला नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायमूर्ती बी. एन. ईचपुरानी यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बुधवारी न्यायालयात कोणताही मोठा युक्तिवाद झाला नाही. अवघ्या 5 मिनिटांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले.
पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे आता खरातची रवानगी कारागृहात होईल. मात्र, त्याच्यावर इतरही गुन्हे दाखल असल्याने गुरुवारी त्याला दुसऱ्या गुन्ह्यासाठी पुन्हा कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथक (SIT) करत आहे. तपासादरम्यान खरात 4 वेगवेगळे मोबाईल नंबर वापरत असल्याचे समोर आले असून त्यातील डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे.
खरातची पत्नी कल्पना खरात सध्या फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. तर, तपासात सहकार्य मिळवण्यासाठी पोलिसांनी खरातच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. अशोक खरातवर दैवी शक्तीचा दावा करून महिलांचे लैंगिक शोषण करणे, अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणे आणि अनेकांना लाखो रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


































































