Malad Murder case प्राध्यापकाची हत्या करणाऱ्या तरुणाला अटक

विलेपार्ले येथील महाविद्यालयाचे प्राध्यापक आलोककुमार सिंग यांच्या हत्येप्रकरणी तरुणाला बोरिवली रेल्वे पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. ओमकार एकनाथ शिंदे असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते. सिंग यांची हत्या ओमकारने केली नसल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी आज केला. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आलोककुमार हे मालाड पूर्व येथे राहत होते. ते विलेपार्ले येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत होते. शनिवारी सायंकाळी त्यांनी अंधेरी रेल्वे स्थानकातून लोकल पकडली. लोकलमध्ये गर्दी असल्याने ते गँगवेत उभे राहून प्रवास करत होते. सायंकाळी पावणेसहा वाजता लोकल मालाड स्थानकात आली. तेव्हा ओमकारचा आलोककुमार यांच्याशी किरकोळ वाद झाला. शाब्दिक बाचाबाचीनंतर ओमकारने त्याच्याकडील तीक्ष्ण हत्याऱ्याने आलोककुमार यांच्यावर वार केले. हा प्रकार गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात आला. काहीच वेळात बोरिवली रेल्वे पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी आलोककुमार यांना रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घडल्याप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. फुटेजच्या आधारे पोलिसांनी ओमकारला कुरारगाव येथून ताब्यात घेऊन अटक केली.

ओमकारला आज न्यायालयात हजर केले होते. त्याच्या वकिलांनी ती हत्या ओमकारने केली नसल्याचा दावा केला. लोकलमधून उतरताना दोघांमध्ये वाद झाला. तो पळून जाण्याचा उद्देश नव्हता. तसेच सरकारी वकिलांनीदेखील जोरदार युक्तिवाद केला. गुन्ह्यातील हत्यार शोधणे बाकी आहे. आलोककुमार आणि ओमकार हे एकाच परिसरात राहत होते.