
श्रीलंकेच्या देशांतर्गत क्रिकेटला अभिमान वाटावा असा एक ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला. अनुभवी डावखुरा फिरकी गोलंदाज मलिंदा पुष्पकुमाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक हजार विकेट्सचा टप्पा पार करत क्रिकेट इतिहासात आपल्या नावे भीमपराक्रम नोंदवला. ही विक्रमी कामगिरी त्याने मूर्स स्पोर्टस् क्लबकडून खेळताना बडुरेलिया स्पोर्टस् क्लबविरुद्ध कोल्ट्स क्रिकेट क्लब मैदानावर साकारली.
दीर्घ कारकीर्द, सातत्यपूर्ण कामगिरी आणि अफाट संयम यांच्या जोरावर पुष्पकुमारा आता मुथय्या मुरलीधरन, रंगना हेरथ आणि दिनुका हेट्टीयाराच्ची या दिग्गज श्रीलंकन गोलंदाजांच्या पंक्तीत सामील झाला आहे, ज्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हजार विकेट्सचा दुर्मिळ टप्पा गाठला आहे तसेच तो या कामगिरीसह प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हजार विकेट्स घेणारा जगातील 218 वा गोलंदाज ठरला.
या यशाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, पुष्पकुमाराने इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट न खेळताच हजार विकेट्स पूर्ण केल्या आहेत. दिनुका हेट्टियाराचीनंतर असा पराक्रम करणारा तो श्रीलंकेतील दुसरा गोलंदाज ठरला आहे. 2018-19 हंगामात एका डावात केवळ 37 धावांत सर्व दहा फलंदाज बाद करण्याची त्याची कामगिरी आजही क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात आहे.


























































