लोकसभेच्या निकालानंतर दिल्लीत बुधवारी इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. नरेंद्र मोदी काहीही आव आणोत पण देशातील जनतेने मोदींच्या विरोधात स्पष्ट कौल दिला असून संविधानावर दृढ विश्वास असलेल्या सर्वांचेच आम्ही इंडिया आघाडीत स्वागत करत आहोत, अशी साद या बैठकीतून घालत नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू करण्यात आली आहे. भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर येऊ नये ही जनतेची इच्छा आहे आणि जनतेची इच्छा पूर्ण करण्यासाठी योग्य वेळी योग्य पावले टाकण्याची रणनीती इंडिया आघाडीने एकमुखाने आखली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. जवळपास दोन तास ही बैठक चालली. बैठकीला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, कल्पना सोरेन, माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा, काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, आपचे संजय सिंह, राघव चड्ढा, तृणमूलचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्यासह 19 पक्षांचे 33 नेते उपस्थित होते.
देशात लोकसभेच्या निकालानंतर उद्भवलेल्या राजकीय स्थितीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यात विविध पक्षांकडून वेगवेगळ्या सूचना करण्यात आल्या व बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. याबाबत खरगे यांनी बैठकीनंतर माध्यमांना माहिती दिली.
देशातील जनता या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या पाठीशी उभी राहिली. त्याबद्दल आम्ही जनतेचे आभार मानत आहोत. या जनादेशाने भाजपच्या द्वेष आणि भ्रष्ट राजकारणाला चोख प्रत्युत्तर मिळाले आहे. भारतीय संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी तसेच महागाई, बेरोजगारी, भांडवलशाहीच्या विरोधात हा जनादेश आहे, असे नमूद करतानाच जनतेला जी आश्वासने आम्ही दिली आहेत ती आम्ही निश्चितपणे पाळू, असा विश्वास खरगे यांनी इंडिया आघाडीच्या वतीने देशातील जनतेला दिला. इंडिया आघाडी ही निवडणूक एकजुटीने आणि पूर्ण ताकदीने लढली आहे असे नमूद करत आघाडीतील सर्व पक्षांचे खरगे यांनी अभिनंदन केले.
मोदी आणि भाजपच्या हुकूमशाही प्रवृत्तीविरोधातील आमची लढाई यापुढेही सुरू राहणार आहे. भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर येऊ नये ही जनतेची इच्छा आहे आणि जनतेची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही योग्यवेळी योग्यती पावले उचलू, असे सूचक विधान खरगे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना केले.
चाचा-भतिजाचा एकाच विमानातून प्रवास
सध्या भाजपसोबत असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत. सत्तास्थापनेत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. त्यात आज पाटणा-दिल्ली प्रवास नितीश आणि राजदचे तेजस्वी यादव यांनी एकाच विमानातून केला. त्यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
सरकार बदलावे ही जनतेची इच्छा
इंडिया आघाडीची एकजूट भक्कम आहे. हुकूमशाही प्रवृत्तीविरोधात जनादेश मिळाला आहे. संविधानाविरुद्ध काम करणाऱ्यांच्या विरोधात जनमत आहे. भाजपचे सरकार बदलण्याची जनतेची इच्छा आहे आणि त्या दिशेने निश्चिपणे पावले टाकू. त्यासाठी योग्यवेळ आणि संधीची आम्ही वाट पाहत आहोत, अशी प्रतिक्रिया बैठकीनंतर संजय राऊत यांनी दिली. नरेंद्र मोदी यांची सर्वसहमतीने एनडीएच्या नेतेपदी निवड करण्यात आल्याकडे लक्ष वेधले असता ही सर्वसहमती कधीपर्यंत राहते, हे येणाऱया काळात तुम्हाला समजेल, असे संजय राऊत माध्यमांना म्हणाले.
जनादेश मोदींच्या विरोधात
जनादेश स्पष्टपणे नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध आहे. भाजपने मोदींचे नाव आणि त्यांच्या चेहऱयावर निवडणूक लढली होती. जनतेने भाजपला बहुमतापासून दूर फेकत मोदींचे नेतृत्व नाकारले आहे. राजकीय आणि नैतिकदृष्टय़ा मोदींचा हा पराभव आहे. पण, मोदींचा स्वभाव सगळ्यांनाच माहीत आहे. ते जनता विरोधात नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न करतील, असे सांगत खरगे यांनी जनादेशाचा आदर करण्यासाठी पावले उचलली जातील, असे स्पष्ट केले.