शिवरायांच्या चार किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मालवणमध्ये अध्यासन केंद्राला मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्गातील सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार किल्ल्यांच्या सखोल अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठा अंतर्गत स्वतंत्र अध्यासन केंद्र उभारण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून 50 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील किल्ल्यांच्या अभ्यास, संशोधन आणि दस्तावेजीकरणाला नवी दिशा मिळणार आहे. हे अध्यासन केंद्र सिंधुदुर्ग जिह्यातील मालवणमध्ये स्थापन होणार आहे.

या निधीमधून सिद्ध होणारे अध्यासन केंद्र ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन, संशोधन प्रबंध, व्याख्यानमाला, युवा संशोधकांना मार्गदर्शन आणि सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट, सर्जेकोट या चारही किल्ल्यांच्या वारशाचे शास्त्रशुद्ध नोंदणीकरण अशा बहुआयामी उपक्रमांसाठी कार्य करणार आहे. शिवकालीन व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखल्या गेलेल्या या भागातील ऐतिहासिक दाखल्यांचा सखोल अभ्यास होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि दूरदृष्टीचा व्यापक प्रसार करण्यास हे अध्यासन हातभार लावेल, असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड. आशीष शेलार यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्ग किल्ला, पद्मदुर्ग किल्ला, राजकोट किल्ला आणि सर्जेकोट किल्ला या चार किल्ल्यांबद्दल खूप मोठय़ा प्रमाणात अजूनही माहिती जनतेसमोर येणं आवश्यक आहे, अजूनही या किल्ल्याबद्दलचा अभ्यास होणं आवश्यक आहे. या विषयासंदर्भात सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील आणि त्यावर अभ्यास करावा लागेल. व्यापाराचे बेट या ठिकाणी होते, त्याबाबतचे ऐतिहासिक दस्तावेज आहेत. म्हणून संस्कृतिक विभागाकडून मुंबई विद्यापीठाला सिंधुदुर्ग किल्ला, पद्मदुर्ग किल्ला, राजकोट किल्ला आणि सर्जेकोट किल्ला या चारही किल्ल्यांच्या अभ्यासासाठी एक अध्ययन केंद्राची आवश्यकता होती त्याला मूर्त स्वरूप देत त्यासाठी आवश्यक असणारा 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मालवण येथील स.का. पाटील महाविद्यालयात डॉ. ज्योती तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र साकारले जाईल.