भाजप सत्तेत आल्यास तुमचं मांसाहार करणंही बंद करेल; निवडणूक सभेत ममता बॅनर्जी यांचं वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता धार चढली असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. “जर भाजप सत्तेत आली, तर ते लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवरही बंधनं आणतील आणि तुम्हाला मांसाहार करण्यापासून रोखतील,” असा दावा ममता बॅनर्जी यांनी एका जाहीर सभेत केला आहे.

उत्तर दिनाजपूर येथील चोप्रा येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या विचारसरणीवर कडाडून टीका केली. त्या म्हणाल्या की, भाजपचे सरकार आल्यास ते केवळ राजकारणच करणार नाहीत, तर तुमच्या स्वयंपाकघरात काय शिजतंय यावरही लक्ष ठेवतील. बंगालची संस्कृती आणि खाद्यसंस्कृती यावर भाजप घाला घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. “हे लोक तुम्हाला मासे, मांस किंवा अंडी खाऊ देणार नाहीत. त्यांना केवळ त्यांच्या आवडीचेच अन्न लोकांवर लादायचे आहे,” असे म्हणत त्यांनी मतदारांना सावध केले.

ममता बॅनर्जी यांनी केवळ खाण्यापिण्याच्या मुद्द्यावरच नव्हे, तर धार्मिक ध्रुवीकरणावरूनही भाजपला लक्ष्य केले. “भाजप हा दंगली घडवणारा पक्ष आहे. त्यांना बंगालमध्ये शांतता नको असून केवळ फूट पाडायची आहे,” अशी टीका त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.