सत्ता बळकावण्यासाठी भाजपने मतदार यादीतून ९० लाख नावे हटवली; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, राज्यात सत्ता बळकावण्यासाठी भाजपने मतदार याद्यांमधून ९० लाख नागरिकांची नावे हटवली आहेत. असे असूनही आगामी निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच विजय मिळवेल, असा दावा ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी केला आहे. ‘पीटीआय’ने (PTI) याबाबत वृत्त दिले आहे.

उत्तर २४ परगना जिल्ह्यातील मीनाखान येथे एका जनसभेला संबोधित करताना बॅनर्जी म्हणाल्या की, मतदार यादीतून हटवण्यात आलेल्या लोकांची नावे पुन्हा समाविष्ट करण्यासाठी त्यांचा पक्ष न्यायालयात धाव घेणार आहे. एसआयआर (SIR) मोहिमेवरून भाजपवर निशाणा साधताना त्या म्हणाल्या, “बंगालमधील सत्ता हस्तगत करण्यासाठी तुम्ही ९० लाख लोकांची नावे हटवली, पण निवडणूक आम्हीच जिंकणार.” राज्यात एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुमारे ९१ लाख मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत, त्या संदर्भात त्यांनी हे विधान केले.

ममता बॅनर्जी यांनी असाही आरोप केला की, भाजपशासित राज्यांमध्ये बांगला भाषिक लोकांचा छळ केला जात असून त्यांना परदेशी आणि घुसखोर म्हटले जात आहे. ही निवडणूक जनतेच्या अस्तित्वाची आणि बंगालच्या ओळखीची लढाई असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच मतदारांनी सतर्क राहून जास्तीत जास्त मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पाल्टा येथील दुसऱ्या रॅलीत ममता बॅनर्जी यांनी दावा केला की, भाजप आपल्या सभांमध्ये गर्दी जमवण्यासाठी लोकांना ५०० रुपयांचे वाटप करत आहे. त्या म्हणाल्या की, “ऑगस्ट २०२६ पासून भाजपचा अंत निश्चित आहे.”