
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 74 आमदारांचा पत्ता कट केला आहे. तसेच 15 आमदारांचा मतदारसंघ बदलला आहे. त्या भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. या ठिकाणी त्यांची लढत भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी यांच्याशी होणार आहे.
ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्व 291 उमेदवारांची यादी जाहीर केली. बंगालमध्ये 294 जागा असून उर्वरित तीन जागा त्यांनी बीजीपीएम या मित्रपक्षासाठी सोडल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी 52 महिलांना यावेळी उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे, यंदा त्यांनी सेलिब्रिटींना उमेदवारी देणे टाळले. केवळ दोन सेलिब्रिटींना त्यांनी संधी दिली आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी 15 सेलिब्रिटींना तिकीट दिले होते.
बंगालमध्ये दिल्लीचा लाडू जिंकणार नाही – ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. निवडणूक लढायची असेल तर गॅस संकट निर्माण करू नका. योग्य प्रकारे मैदानात या. यावेळी भाजपला गेल्या निवडणुकीपेक्षा कमी जागा मिळतील. ही बंगालच्या अस्तित्वाची लढाई असून त्यात बंगाल जिंकेल, दिल्लीचा लाडू नाही, असा टोला ममतांनी लगावला.

























































