
मेक्सिकोतील झकाटेकास येथे झालेल्या पहिल्या बलून महोत्सवाला गालबोट लावणारी घटना घडली. हॉट एअर बलूनला आग लागल्याने यात एकाचा मृत्यू झाला आहे. जळत्या बलूनसह वर जाताना तो बलूनच्या दोरीत अडकला. लुइसियो एन असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
फुग्याला आग लागल्यानंतर लुइसियोने दोन जणांना बलूनमधून सुरक्षित बाहेर काढले. मात्र तो स्वतः बलूनच्या दोरीत अडकला आणि फुग्यासह हवेत उडू लागला. पोलिसांनी लुइसियोचा मृतदेह बलूनमधून बाहेर काढत रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. वाचलेले अन्य दोन जण किरकोळ भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. झाकाटेकासचे सरचिटणीस रॉड्रिगो रेयेस मुगुएर्झा यांनी घटनेची पुष्टी केली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी उत्सवांच्या काळात सुरक्षा तपासणी वाढवण्याचे आणि यंत्रणा वाढवण्याचे स्थानिक नगरपालिकांना आवाहन केले.